पुणे : रमजान ईदसाठी खरेदीला उधाण | पुढारी

पुणे : रमजान ईदसाठी खरेदीला उधाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पठाणी, शेरवानी, कुर्ता-पायजमा अशा विविध कपड्यांच्या खरेदीत मग्न असलेले तरुण… बांगड्या, मॅचिंग दागिने, मेहंदीसह विविध सौंदर्य प्रसाधने, कपडे आणि भांडी खरेदी करण्यासाठीची महिला-युवतींची लगबग….असे काहीसे वातावरण बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. शनिवारी (दि.22) रमजान ईद उत्साहात साजरी होणार असल्याने मुस्लिम समाजबांधव खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी करीत आहेत. खासकरून कॅम्प परिसर आणि खडकीत गर्दी पाहायला मिळत आहे. कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत…पारंपरिक पेहरावाच्या खरेदीपासून ते खाद्यपदार्थांच्या खरेदीपर्यंत…सध्या ईदसाठीच्या खरेदीला उधाण आले आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यानंतर आता मुस्लिम समाजबांधव मोठ्या उत्साहात आणि आनंदात रमजान ईद साजरी करणार आहेत. ईदची तयारी आणि खरेदीलाही प्राधान्य देत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडत आहे. त्यामुळे बाजारपेठा नावीन्यपूर्ण वस्तूंनी सजल्या आहेत. खासकरून कपड्यांच्या दालनांमध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे. पठाणी, शेरवानी, कुर्ता -पायजमा यांसह विविध प्रकारचे पारंपरिक पेहराव खरेदीसाठी करण्यासाठी दालनांमध्ये, तर पारंपरिक पेहराव शिवून घेण्यासाठी टेलर्सच्या दुकानांमध्येही गर्दी दिसून येत आहे. तर, महिला-युवतींचा रेडिमेड कपड्यांवर भर असून, पंजाबी ड्रेसपासून ते अनारकलीपर्यंतच्या खरेदीत महिला-युवतींचा भर आहे.

गुरुवारीही कॅम्प येथील छत्रपती शिवाजी मार्केटसह कॅम्प परिसरातील विविध दालनांमध्ये खरेदीसाठी लगबग दिसून आली. तर, शहर आणि उपनगरांतील विविध ठिकाणीही खरेदीसाठी लोक येत आहेत. मेहंदी, सौंदर्य प्रसाधने, कपडे, दागिन्यांची खरेदीवर महिला-युवतींचा भर आहे. ईदसाठी विशेष म्हणजे शेवया, खजूर, विविध फळे, ड्रायफ्रूटससह सरबतचीही खरेदी केली जात आहे. विद्युत रोषणाईने सजलेल्या दालनांनी संपूर्ण बाजारपेठा उजळल्या आहेत.

खरेदीसाठी आलेल्या रुमाना खान म्हणाल्या, की रमजान ईदसाठी नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारात आले होते. संपूर्ण कुटुंबासाठी कपड्यांची खरेदी केली. तसेच, बांगड्या, मेहंदीचीही खरेदी केली. सध्या बाजारपेठांमध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी होत असून, एक वेगळेच वातावरण येथे पाहायला मिळत आहे.

Back to top button