बदलत्या जीवनशैलीमुळे ‘फॅटी लिव्हर’चा धोका | पुढारी

बदलत्या जीवनशैलीमुळे ‘फॅटी लिव्हर’चा धोका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जंक फूडचे सेवन, मद्यपान आणि धूम्रपानासारख्या सवयी, बदललेली जीवनशैली यामुळे ‘फॅटी लिव्हर’चा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यकृताभोवती अतिरिक्त चरबी जमण्याच्या प्रक्रियेची लक्षणे सुरुवातीला दिसून येत नाहीत. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी यकृताची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत यकृततज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. फॅटी लिव्हर कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीवर परिणाम करू शकते. त्यामुळे फॅटी लिव्हरचा परिणाम याविषयी जनजागृती केली जात आहे. 20 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तींनी किमान दोन वर्षांतून एकदा आणि चाळीशीनंतर दरवर्षी तपासणी करावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपीन विभूते म्हणाले, आजच्या काळात यकृताच्या आरोग्याचा विचार करता फॅटी लिव्हर ही मोठी चिंतेची बाब बनत चालली आहे. शरीराला शक्ती देण्यापासून ते रक्ताचे शुद्धीकरण, टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचे महत्त्वाचे कार्य यकृत करत असते. धकाधकीच्या जगात प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करणे आणि जीवनशैलीत सुधारणा करणे आवश्यक आहे.

फॅटी लिव्हर डिसीज हे अल्कोहोलिक किंवा नॉन अल्कोहोलिक या दोन प्रकारचे असतात. एएफएलडी हा आजार अतिरिक्त मद्यपान केल्यामुळे होतो. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज स्थुलता, उच्च रक्तदाब, मधुमेह यामुळे होतो.
                                   -डॉ. हर्षल राजेकर, कन्सल्टंट गॅस्ट्रोएंन्ट्रोलॉजिस्ट

Back to top button