नाझरे धरणात 40 टक्के पाणीसाठा शिल्लक | पुढारी

नाझरे धरणात 40 टक्के पाणीसाठा शिल्लक

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर आणि बारामती तालुक्याची संजीवनी नाझरे (मल्हार सागर) धरणात यंदा चांगल्या पावसामुळे अद्यापही 40 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. खरीप व रब्बी हंगामात पाणी मागणी न झाल्यामुळे उन्हाळी पिकांना पहिले आवर्तन दि. 16 रोजी संपले. आता दुसरे आवर्तन दि. 25 एप्रिल रोजी देणार आहे. नाझरे धरणाची 788 दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता आहे. जलाशयावर तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत.

योजनांतर्गत जवळपास 56 गावे व वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. जेजुरी शहर, जेजुरी एमआयडीसी तसेच इंडियन सिमलेक्स कंपनी, पारगाव-माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पारगाव, माळशिरस, वाघापूर, सिंघापूर, गुर्‍होळी, राजेवाडी, आंबळे, पिसर्वे, नायगाव, रिसे, पिसे, कोळविहिरे, मावडी क. प. व इतर गावे आहेत. नाझरे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत नाझरे क. प., नाझरे सुपे, जवळार्जुन, पांडेश्वर आदी गावे तर मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत मोरगाव, आंबी, तरडोली, बाबुर्डी, लोणी भापकर, लोणी माळवाडी आदी 56 गावे व वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा नाझरे धरणातून होतो.

यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही
गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे नाझरे धरण पूर्णक्षमतेने भरले. धरणाची क्षमता सुमारे पाऊण टीएमसी असून, मृतसाठा 200 दशलक्ष घनफूट आहे. सध्या जलाशयात 433 दशलक्ष घनफूट (40 टक्के) पाणीसाठा उरला आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा चांगला असल्याने यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही. सध्या अडीचशे हेक्टर शेतीला पाण्याची मागणी असून, उन्हाळी पिकांना पहिले आवर्तन दिले आहे. दि. 25 एप्रिल रोजी दुसरे व शेवटचे आवर्तन दिले जाणार आहे.

Back to top button