खंडाळ्यात मटक्याच्या डावावर छापा ; आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची कारवाई | पुढारी

खंडाळ्यात मटक्याच्या डावावर छापा ; आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची कारवाई

लोणावळा : लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाया सुरू केल्या आहेत. या कारवाईत अजून एक भर पडली असून खंडाळ्यात सुरू असलेल्या मटक्याच्या डावावर छापा टाकला आहे. या छाप्यात 1 लाख 38 हजार 790 रुपयांच्या मुद्देमाल ताब्यात घेत पाच जणांच्या विरोधात मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करीत कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल भूषण दशरथ कुँवर याने याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमी मिळाली. मौजे खंडाळा गावाच्या हद्दीमध्ये तळयाच्या शेजारी लोक बेकायदेशीर बिगरपरवाना कल्याण मटका जुगार खेळत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळताच तातडीने पो. हवा. ए.बी.नायकुडे, पो. कॉ. एस. डी. शिंदे, ए. व्हि. पवार, भूषण कुँवर, ए. पी. वायदंडे यांना सांगून बातमीचा आशय कळवून छापा टाकण्याच्या सूचना दिल्या.

सर्व पोलीस खाजगी गाडीने त्याठिकाणी पोहचले असता काही नागरिक हातामध्ये मोबाईल घेवून चिठठीवर आकडेमोड करीत होते. पोलिसांनी त्यानां जागीच पकडून त्यांची चौकशी करीत त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आणि 20790 रुपयांची रोकड जप्त केली.

याप्रकरणी पोलिसांनी रितेश शाम दळवी (वय २७, रा खंडाळा बाजारपेठ), सुरेश दत्तु मानकर (वय ६२, रा कुणेनामा ता मावळ), युसुफ तय्यबअली शेठीया (रा समरहिल, कुणेनामा ता मावळ), मुनीर अब्दुला रहेमान बागवान (वय ५२, रा हनुमानटेकडी, लोणावळा) आणि लतीकेश शाम दळवी (वय २३, रा खंडाळा बाजारपेठ) यांच्या विरुद्ध मुंबई जुगार कायदा अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहे.

Back to top button