पिंपरी शहरातील काही भागात पाण्याला वास | पुढारी

पिंपरी शहरातील काही भागात पाण्याला वास

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील काही भागामध्ये पाण्याला वास येत आहे. तर, काही ठिकाणी गाळमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणार्‍या क्लोरिनचे प्रमाणही वाढविण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तथापि, पाण्यामध्ये निश्चित प्रमाणातच क्लोरिन टाकले जात असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

थेरगाव, रावेत परिसरात काही ठिकाणी पाण्याला वास येत आहे. तसेच, पाण्याची चवही बिघडली असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे, पिंपळे गुरव परिसरात येणारे पाणी हे गाळमिश्रित असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. पाणी भरल्यानंतर भांड्यात खाली गाळ साचतो. पाणीपुरवठा विभागाचे सह-शहर अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले की, दूषित पाणीपुरवठा किंवा पाण्याला वास येत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त झालेल्या नाहीत.

एखाद्या ठराविक परिसरात ही समस्या जाणवत असेल तर त्याचा शोध घ्यावा लागेल. सध्या जलशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणार्‍या क्लोरिनचे प्रमाण वाढवलेले नाही. त्याचप्रमाणे, पाण्याचा गढूळपणा कमी करण्यासाठी पॉली अ‍ॅल्युमिनियम क्लोराईड मिसळण्यात येत आहे. तेदेखील निश्चित प्रमाणात मिसळले जात आहे.

Back to top button