खारावडे : कालिचरण सोलनकर ‘अमृतेश्वर केसरी किताब’चा मानकरी | पुढारी

खारावडे : कालिचरण सोलनकर ‘अमृतेश्वर केसरी किताब’चा मानकरी

खारावडे (ता. मुळशी); पुढारी वृत्तसेवा : मुठा खोर्‍यातील कोंढूर येथील ग्रामदैवत अमृतेश्वराच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात सोलापूरच्या कालिचरण सोलनकर याने पुणे जिल्हातील किसन कोकाटे याला पराभूत करून ‘अमृतेश्वर केसरी किताब’ मिळवला. सोलनकरला रोख 1 लाख 51 हजार रुपये व मानाची चांदीची गदा, शाल व श्रीफळ देत गौरविण्यात आले. तर उपविजेता किसन कोकाटे याला रोख 50 हजार रुपये, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

मुठा खोरे वारकरी संप्रदाय समितीचे अध्यक्ष ह.भ.प. रामचंद्र महाराज भरेकर, मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कोंढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडू करंजावणे, मुठा गावचे सरपंच शंकर मोहोळ यांच्या हस्ते मल्लांना 15 लाखांहून अधिक रुपयांच्या बक्षिसांचे वाटप करण्यात आले. या वेळी पंच म्हणून चंद्रकांत मोहोळ, हनुमंत मणेरे, सागर तांगडे, नीलेश मारणे, विक्रम पवळे, संजय दाबाडे यांनी काम पाहिले. समालोचन बाबा निम्हण यांनी केले.

दरम्यान, यात्रेनिमित्त निशाणापूजन, पालखी मिरवणूक, छबिना, ढोल-ताशा-लेझीम खेळ आदी विविध कार्यक्रम झाले. यात्रेदरम्यान आमदार नीलेश लंके, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, अंकुश उभे, सचिन खैरे यांनी भेट देत दर्शन घेतले. मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कोंढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच प्रमोद मरगळे, उपसरपंच गुलाब कोंढरे, राजेंद्र कोंढरे, तुकाराम हाळंदे, शंकर मरगळे, शिवाजी ढेबे, हनुमंत कोंढरे, विनोद शिंदे, अनंता कोंढरे व कोंढूर ग्रामस्थांनी यात्रेचे नियोजन केले.

Back to top button