पुण्यातील रस्त्यांवर दिमाखात धावल्या विंटेज, क्लासिक कार | पुढारी

पुण्यातील रस्त्यांवर दिमाखात धावल्या विंटेज, क्लासिक कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तरुणाईमध्ये जुन्या गाड्यांचे असलेले आकर्षण…. विथ सेल्फीसाठी लागलेली चढाओढ… गाडी चालवण्यासाठी सज्ज झालेले ज्येष्ठ नागरिक आणि रॅलीदरम्यान नागरिकांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत अशा उत्साहात विंटेज व क्लासिक कार्स रॅलीला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला.

पुण्याचे पहिले महापौर कै. बाबूराव सणस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विंटेज कार ट्रॉफी रवी अवेलु यांच्या फोर्ड व्ही 8 या गाडीला तर क्लासिक कार पुरस्कार योहान पुनावाला यांच्या 1948 च्या बेंटल मार्क व्हीआय या गाडीला देण्यात आला. रॅलीचे प्लॅग ऑफ आणि पारितोषिक वितरण अतिरिक्त पोलिस आयुक्त व माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी आरडब्ल्यूआयटीसीचे अध्यक्ष सुरेंद्र सणस, विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया क्लबचे चेअरमन नितीन डोसा, रॅलीचे आयोजक व म्युझियमचे सुभाष सणस यांसह मान्यवर उपस्थित होते. जुन्या रंगीबेरंगी दुर्मीळ जुन्या 70 ते 80 विंटेज व क्लासिक कार्स आणि सुमारे 30 ते 40 विंटेज स्कूटर्स व मोटारसायकल सहभागी झाल्या होत्या. सुभाष सणस यांच्या मालकीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवे आदी वाहनांचा समावेश होता.

अन् नेने झाल्या विंटेज आजी
सन 1934 सालची असलेली ऑस्टिन 7 ही गाडी माझ्या जन्मापूर्वीची आहे. ही गाडी मी 1964 मध्ये विकत घेतली, तेव्हापासून गाडी माझ्याकडेच आहे. या गाडीतून नागपूर ते पुणे असा तब्बल 896 किलोमीटरचा सर्वात मोठा प्रवास मी केलेला आहे. आजही त्याच उत्साहाने गाडी चालवत असून गाडीची देखभाल ही घेत असल्याचे 87 वर्षांच्या प्रभा नेने यांनी सांगितले.

Back to top button