मांडवगण फराटा : पाइपलाइन गळतीमुळे रस्त्यावर पडले खड्डे | पुढारी

मांडवगण फराटा : पाइपलाइन गळतीमुळे रस्त्यावर पडले खड्डे

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा ते वडगाव रासाई रस्त्यावर मांडवगण हद्दीतील काही शेतकर्‍यांच्या पाइपलाइनमधून गळती होत आहेत. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणाहून वाहनचालकांना प्रवास करणे त्रासदायक बनले आहे. रात्रीच्या वेळी अपघात देखील वाढले आहेत. लवकरात लवकर पाइप लाइनची गळती थांबवण्याकरिता शेतकर्‍यांना सूचना देत रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांसह स्थानिकांकडून होत आहे.

मांडवगण फराटा ते वडगाव रासाई रस्त्यावर मांडवगण गावात प्रवेश करताना लगतच्या शेतकर्‍यांच्या शेतात जाणार्‍या पाइप लाइन फुटून त्यातून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून जागोजागी चिखल झालेला आहे. तसेच मोठमोठे खड्डेदेखील पडलेले आहेत. या रस्त्यावरून अवजड वाहने, ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टरची मोठी वर्दळ आहे. त्यामुळे रस्तादेखील खचलेला आहे.

त्याचा या रस्त्याने नियमित प्रवास करणारे शेतकरी, शाळकरी विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चिखलात दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. तर रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने त्यात आदळून वाहनांना अपघात होत आहेत. याबाबत संबंधित विभागाने लक्ष घालून लवकरात लवकर ज्या शेतकर्‍यांच्या पाइप लाइन फुटल्या आहेत त्यांच्या दुरुस्तीची तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

Back to top button