बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षासह तज्ज्ञ संचालकाचा राजीनामा फेटाळला | पुढारी

बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षासह तज्ज्ञ संचालकाचा राजीनामा फेटाळला

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाचा सचिन सातव यांनी दिलेला राजीनामा शनिवारी (दि. ८) झालेल्या संचालक मंडळ बैठकीत फेटाळण्यात आला. त्यामुळे बॅंकेच्या अध्यक्षपदाची धुरा सचिन सातव यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय तज्ज्ञ संचालक प्रीतम पहाडे यांचाही राजीनामा नामंजूर करण्यात आला. रोहित घनवट यांचा उपाध्यक्षपदाचा व तज्ज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर यांचा संचालक पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला.
 गेल्या तीन दिवसांपूर्वी पक्ष आदेशानुसार या चौघांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. सातव यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने बॅंकेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत केली असताना पक्ष नेतृत्वाने राजीनामे का घेतले, हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीत शनिवारी या विषयाचा निकाल लागला. शनिवारी संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यात सातव यांनी अध्यक्षपदाचा तर पहाडे यांनी संचालक पदाचा दिलेला राजीनामा फेटाळण्यात आला.
 रोहित घनवट यांनी दिलेला उपाध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर कऱण्यात आला. त्यामुळे आता बॅंकेचे उपाध्यक्षपद रिक्त झाले आहे. या शिवाय तज्ज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. बॅंकेतील या घडामोडींमुळे बारामतीत विविध संस्थांवर काम करणाऱ्या संचालकांचे धाबे दणाणले होते. परंतु सातव व पहाडे यांनी बॅंकेच्या प्रगतीसाठी केलेल्या कामाची अखेर दखल घेतली गेली. सातव यांच्या नेतृत्वात बॅंकेने विक्रमी वसूली कऱण्यासह एनपीए कमी केला. बॅंकेला यंदा चांगला नफा झाला आहे.

Back to top button