हे तर प्यादे.. निलंबितांच्या मागे नेमके कोण? | पुढारी

हे तर प्यादे.. निलंबितांच्या मागे नेमके कोण?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : साक्षात पोलिसच लुटारू बनल्याने सामान्य नागरिकांनी बघायचे कोणाकडे, असा प्रश्न पडणारी ही घटना आहे. प्रवाशांची लूट करणारे साधे पोलिस कर्मचारी असले, तरी त्यांच्या मागे नेमके कोण हा संशोधनाचा विषय आहे. याचे धागेदोरे बड्या अधिकार्‍यापर्यंत असण्याची शक्यता आहे. दरम्यान, दैनिक ’पुढारी’ने तीन वर्षांपूर्वी वृत्त प्रसिद्ध करून लोहमार्ग पोलिसांच्या गैरप्रकाराला वाचा फोडली होती.

पुणे स्टेशन येथे लोहमार्ग पोलिसांचा बॅग तपासणीच्या नावाखाली भलताच कारभार चालत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी ’ऑफ द रेकॉर्ड’ दिली. यापूर्वी येथे असे गंभीर प्रकार घडले आहेत. परप्रांतीय मजुरांना येथील पोलिसांकडून टार्गेट केले जाते. वर्षभर पोटाला चिमटा घेऊन जमा केलेली पुंजी गावी घेऊन जाताना, बॅगेत गांजा, तंबाखू आढळली, आधार कार्ड नाही सांगून त्यांचा कष्टाचा पैसा हे लोक लुबाडत असल्याचे सांगितले जाते. निर्ढावलेल्या या कर्मचाऱ्यांच्या अनेकदा बदल्या करण्यात आल्या.

मात्र तरीदेखील रेटींगचे-सेटींग करत त्यांनी आपली वर्णी येथे लावून घेतली. त्यांचे कर्ते-करविते मोकाट आहेत. या प्रकरणात दोन वेळा लोहमार्ग पोलिस महासंचालकांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेत कारवाई केली आहे. त्यामुळे पडद्याआड सुरू असलेला बिनबोभाट कारभार चव्हाट्यावर आला.

दोघांवर गुन्हा दाखल…
निलंबितांमधील काही कर्मचारी आलटून-पालटून बदली करून घेत, गेल्या अनेक वर्षांपासून येथे नोकरी करत आहेत. सहायक फौजदार, बाळू पाटोळे, हवालदार सुनील व्हटकर या दोघांवर बॅग तपासणी दरम्यानचाच एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. असे असतानादेखील त्यांना येथे कर्तव्य देण्यात आले. पूर्वी बॅग तपासणीसाठी येथे पाच पथके तैनात होती. त्यांना खास ’भैया पार्टी’ म्हटले जायचे. या पार्टीत काम करण्यासाठी कर्मचार्‍यात स्पर्धा लागायची. नेमणुकीला असलेले कर्मचारी सरकारी कर्तव्य न करता, केवळ सावजाच्या शोधात असतात. सध्या येथे दोन पथके हे काम करतात. दरम्यान यापूर्वी सात पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे.

चौकशी दुसर्‍या अधिकार्‍याकडे हवी..
यापूर्वी निलंबित करून बडतर्फ करण्यात आलेल्यांची चौकशी नागपूर येथील अधिकार्‍यांकडे देण्यात आली होती. मात्र, सध्या निलंबित करण्यात आलेल्यांची चौकशी येथील अधिकार्‍यांकडेच देण्यात आली आहे. पारदर्शक कारवाईसाठी चौकशी बाहेरच्या अधिकार्‍यांकडे देण्याची गरज आहे.

Back to top button