पुणे : पालखी महामार्गांवरील कामांची पाहणी करा; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश | पुढारी

पुणे : पालखी महामार्गांवरील कामांची पाहणी करा; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर चालू असलेल्या प्रकल्पांच्या कामाची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी उपविभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत. जून महिन्यात आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व देहू येथून श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होत असते. पायी आषाढीवारीकरिता महाराष्ट्रातून हजारो वारकरी येत असतात.

या वारकर्‍यांसाठी आवश्यक सुविधा देण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येते. वारीचे आयोजन पावसाळ्याच्या सुरुवातीस होत असल्याने वारकर्‍यांसाठी पालखी मार्ग व पालखी तळावर आवश्यक व्यवस्था करण्याच्यादृष्टीने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना डॉ.देशमुख यांनी दिल्या आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या प्रकल्पाची कामे ठिकठिकाणी सुरू आहेत.

हवेली, खेड, दौंड-पुरंदर, बारामती-इंदापूर या तालुक्यांच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी आषाढी यात्रा (पायीवारी) 2023 च्या अनुषंगाने आपापल्या कार्यक्षेत्रातून जाणार्‍या दोन्हीही पालखी मार्गाच्या पूर्ण झालेल्या आणि प्रगतिपथावर असलेल्या कामांची आळंदी व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त व इतर सदस्य आणि तालुकास्तरावरील अधिकार्‍यांसमवेत पाहणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

Back to top button