पिंपरी : यंदा जलतरणाच्या संधी दुर्मिळ ; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आठपैकी पाच तलाव बंद | पुढारी

पिंपरी : यंदा जलतरणाच्या संधी दुर्मिळ ; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आठपैकी पाच तलाव बंद

मिलिंद शुक्ल :

पिंपरी :  उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अंगाचा दाह घालविण्यासाठी नागरिकांची पावले जलतरण तलावाकडे वळू लागली आहेत. शहराच्या विविध भागांतील 13 जलतरण तलावांपैकी केवळ आठ तलाव सुरू असून, पाच तलाव बंद आहेत. मात्र, शहरातील 13 तलावांपैकी 5 तलाव बंद असल्याने संबंधित भागातील नागरिकांचा हिरमोड होत आहे. महापालिकेच्या वतीने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरीगाव, यमुनानगर, पिंपळे गुरव, नेहरूनगर, चर्‍होली वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी आणि आकुर्डी या भागांत 13 जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील चिंचवड केशवनगर, संभाजीनगर, नेहरुनगर, चर्‍होली, कासारवाडी, पिंपरीगाव, यमुनानगर आणि पिंपळेगुरव हे आठ जलतरण तलाव चालू आहेत. तर, भोसरी, मोहननगर, सांगवी, थेरगाव, आकुर्डी या भागातील पाच जलतरण तलाव बंद आहेत.

मार्च महिना संपला असून, तापमानातील तीव्रता वाढत आहे. उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. एप्रिमध्ये उन्हाची तीव—ता आणखी वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात तलावांमध्ये पोहायला मोठ्या संख्येने नागरिक जातात. महापालिकेच्या जलतरण तलावावर एक तास पोहण्यासाठी दहा रुपये शुल्क आकारण्यात येते. तसेच वयोगटानुसार तिमाही, सहामाही तसेच वार्षिक पास देण्यात येतात. त्यामुळे महापालिकेच्या तलावावर उन्हाळ्यात मोठी गर्दी असते. महापालिकेच्या नियोजनाअभावी उन्हाळा सुरू होऊनही पाच जलतरण तलाव बंद आहेत. त्यामुळे खेळाडू, नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या वतीने 13 जलतरण तलाव उभारले आहेत. यापैकी सद्यस्थितीत आठ तलाव सुरू आहेत.

सुरू तलाव
साई अक्वामरीन तलाव, संभाजीनगर, चिंचवड
कै. वस्ताद बाळासाहेब गावडे तलाव, केशवनगर, चिंचवड
कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम तलाव, नेहरुनगर
संत ज्ञानेश्वर तलाव, वडमुखवाडी, चर्‍होली
कै. सो. मॉसाहेब मीनाताई ठाकरे तलाव, यमुनानगर, निगडी
कै. मारुती कोंडिबा वाघेरे तलाव, पिंपरीगाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव, कासारवाडी आयटीआयजवळ
कै. काळुराम जगताप तलाव, काटे पुरम चौक, पिंपळे गुरव

बंद तलाव
राजर्षी शाहू महाराज तलाव, मोहननगर
श्री. छत्रपती शिवाजी महाराज तलाव, सेक्टर 26, निगडी प्राधिकरण
कै. बाळासाहेब लांडगे तलाव, भोसरी सहल केंद्र, भोसरी
खिंवसरा पाटील तलाव, थेरगाव
कै. बाळासाहेब शितोळे तलाव, शितोळेनगर, सांगवी

Back to top button