फुरसुंगी-उरुळी देवाची न. प.ला पहिल्या वर्षी 300 कोटी उत्पन्न | पुढारी

फुरसुंगी-उरुळी देवाची न. प.ला पहिल्या वर्षी 300 कोटी उत्पन्न

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फुरसुंगी-देवाची उरुळी गावांचा विकास आम्हाला पिंपरी-चिंचवड शहराच्या धर्तीवर करायचा असून, स्वतंत्र नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षात बांधकाम परवानगीतून 300 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. तसेच, नगरोत्थान योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळेल, असा विश्वास माजी मंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.

फुरसुंगी-देवाची उरुळी गावे महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद केल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवतारे बोलत होते. ते म्हणाले की, महापालिकेने गावांमध्ये सुविधा दिल्या नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावांना 25 कोटींचा निधी जाहीर केला. येत्या 10 ते 15 दिवसांत या गावांमधील पाण्याचा प्रश्न सुटेल, असेही शिवतारे म्हणाले.

लवकरच पुरंदर विमानतळनिर्मितीचे काम सुरू होणार आहे. यामुळे संपूर्ण पुरंदरचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल. याचा लाभ या दोन्ही गावांना होईल. महापालिकांच्या निवडणुकांसोबतच या नगरपरिषदेची निवडणूक घेतल्यास विकास आराखडा तयार करण्याची संधी स्थानिक लोकप्रतिनिधींना मिळेल, असे ते म्हणाले.

ही गावे वगळण्याला होणारा विरोध हा राजकीय असून, तब्बल 99 टक्के स्थानिक नागरिक नगरपरिषदेच्या बाजूने आहेत. मात्र, काही मंडळी राजकीय विरोध करीत आहेत. स्थानिक आमदार संजय जगताप यांनी मिळकतकर कमी करतो, असे आश्वासन दिले होते. परंतु, ते आश्वासनपूर्ती करू शकले नाहीत, ते माठ आहेत, अशी टीकाही शिवतारे यांनी केली.

संजय राऊत धमक्यांना घाबरणार नाहीत
खासदार संजय राऊत यांना धमकी आल्याच्या प्रश्नावर शिवतारे म्हणाले, ‘संजय राऊत यांच्यासोबत मी काम केले आहे, मी त्यांना चांगले ओलखतो. ते सच्चे शिवसैनिक आहेत. ते कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाहीत. महाराष्ट्राला त्यांची गरज आहे.’

सुळे यांनी माहिती घेऊन बोलावे
जांभुळवाडी तलावाच्या विकासकामांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांवर शिवतारे म्हणाले, ‘तलावाभोवती असलेल्या वॉकिंग ट्रॅकचे एक कोटी रुपयांचे काम लोकसहभागातून केले. उर्वरित काम करण्यासाठी जो ठेकेदार नियुक्त केला गेला, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. त्याने काम केले नाही. त्यामुळे सुळे यांनी माहिती घेऊन बोलावे.’

Back to top button