आंबेगाव तालुक्यात बिबट्यांमुळे कुक्कुटपालनावर मोठा परिणाम | पुढारी

आंबेगाव तालुक्यात बिबट्यांमुळे कुक्कुटपालनावर मोठा परिणाम

लोणी-धामणी(ता. आंबेगाव ); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पशुधनाबरोबर मानवावरील हल्ले वाढल्याने ग्रामस्थ भयभीत आहेत. शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालनावर परिणाम होत आहे. आंबेगाव तालुक्यात घोड नदी, डिंभे धरण आदींमुळे बिबट्यांना अनुकूल वातावरण आहे. बिबट्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. उसाच्या शेतात मादी बछड्यांसह वास्तव्यात आहे. त्यामुळे उसाची मशागत व खत व्यवस्थापनास अडथळे होतात. मजूर खते टाकण्यास येत नाहीत.

भविष्यात उसाची शेती अवघड होणार आहे. बिबटे ऊसतोड सुरू झाली की तात्पुरती जागा बदलतात. पुन्हा ऊस फुटून वाढू लागला की त्याच ठिकाणी येतात. त्यामुळे शेतांमध्ये आपली पिढी तयार करतात की काय? असा सवाल विचारला जात आहे. आंबेगावच्या पूर्व भागात जिरायती परिसरातही बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिबट्या रोज कुठे ना कुठे गाय, म्हैस, वासरे यांना आपले भक्ष्य करत आहे.

पिंजरे लावूनही पिंज-यात कैद झालेले दिसत नाहीत. त्यामुळे वनविभागही हतबल झाल्याचे दिसून येते. वाडी, वस्ती, मळ्यात राहणा-यांना बिबट्यांच्या दहशतीचा सामना करावा लागत आहे. रात्री घरासमोर आला तरी लोक बाहेर पडू शकत नाहीत. लहान मुलेही शाळेत जाण्यास घाबरतात. अनेक शेतकर्‍यांनी गोठे व घराला तारेचे, दगडाचे कंपाऊंड बांधून तारा लावल्या आहेत. बिबट्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वच गावांतील ग्रामस्थांनी केली.

Back to top button