चांडोली बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू | पुढारी

चांडोली बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : चांडोली बुद्रुक येथील वेताळमळ्यातील शेतकरी कैलास लक्ष्मण थोरात यांच्या घरालगतच्या गोठ्यामध्ये प्रवेश करून बिबट्याने 3 शेळ्यांचा फडशा पाडला. ही घटना शनिवारी (दि. 1) पहाटे घडली. माजी उपसरपंच संदीप थोरात यांनी ही माहिती दिली. बिबट्याच्या हल्ल्याबाबत माहिती कळताच वनरक्षक प्रदीप औटी, वनमजूर जालिंदर थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे वेताळमळा वस्तीवर घबराटीचे वातावरण पसरले आहे.

वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गोविंद थोरात यांनी केली. बिबट्याने 3 शेळ्या ठार मारल्याने कैलास थोरात यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शेतकर्‍यांनी यापुढील काळात बंदिस्त गोठा करताना दरवाजाच्या वरील बाजूस जाळी टाकावी. तसेच, जाळीच्या खालील बाजूस मजबुतीकरण करावे. यामुळे बिबट्याला गोठ्यात प्रवेश करता येणार नाही, असे संदीप थोरात यांनी सांगितले.

Back to top button