मांडवगण फराटा : शिट्ट्या अन् चितपट कुस्त्यांनी रंगला आखाडा | पुढारी

मांडवगण फराटा : शिट्ट्या अन् चितपट कुस्त्यांनी रंगला आखाडा

मांडवगण फराटा (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : टाळ्या, शिट्ट्या अन् चितपट कुस्त्यांनी शिरसगाव काटा येथील आखाडा चांगलाच रंगला. शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत श्री कोल्हाटी बुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या आखाड्यात पुणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. दुपारी चार वाजता लहान गटापासून आखाड्याची सुरुवात केली.

या वेळी अनेक मल्लांनी डाव-प्रतिडाव दाखवत केलेल्या कुस्त्यांनी कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या वेळी उपस्थितांनीही टाळ्या, व शिट्ट्या वाजवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कुस्त्यांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य दादासो कोळपे, अजित गद्रे, विकास जगताप, शिवाजी चव्हाण, गनीभाई शेख, एम. एस. कदम, पोलिस निरीक्षक युनूस शेख, बाळासो भालेराव, जालिंदर शिंदे आदींनी पंच म्हणून काम पाहिले. कुस्त्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बाजार समितीचे संचालक विजेंद्र गद्रे, घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने, संतोष जाधव, रामचंद्र केदारी, किरण जगताप आदींनी मेहनत घेतली. या आखाड्यात सुमारे 195 कुस्त्या झाल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली.

दरम्यान, यात्रेच्या पहिल्या दिवशी बुधवारी पहाटे श्रींचा अभिषेक करण्यात आला. सकाळी विधिवत पूजा, दुपारी शेरणी वाटप तसेच रात्री छबिना व लोकनाट्याचा कार्यक्रम पार पडला. दुसर्‍या दिवशी गुरुवारी सकाळी श्री रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी गावातील विविध भजन मंडळांनी भजन सादर केले. तसेच अंजली नाशिककर यांचा हजेरी व रात्री नऊ वाजता लोकनाट्याचा कार्यक्रम पार पडला. यात्रोत्सव काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती सरपंच ज्योती संतोष जाधव यांनी दिली.

Back to top button