पुणे : रस्त्यावर ठेवलेल्या पाईपचे करायचे काय ? | पुढारी

पुणे : रस्त्यावर ठेवलेल्या पाईपचे करायचे काय ?

कोथरूड : पुढारी वृत्तसेवा : कर्वेनगर भागात मुख्य रस्त्यावर सिमेंटच्या आकाराचे मोठे पाइप पडलेले असून, वारंवार किरकोळ अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. महिनाभरापासून काम बंद असून, रस्त्यावरच पाइप ठेवलेले आहेत. याबाबत संबंधित यंत्रणा कोणतीच उपाययोजना करत नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्वेनगर भागातील मावळेआळीकडून स्पेंसर चौकाकडे जाणार्‍या मार्गावर मोठ्या आकाराचे सिमेंटचे सात पाइप रस्त्यावर डाव्या बाजूला ठेवण्यात आलेले आहेत. कर्वेनगर मुख्य चौक, वारजे माळवाडीकडून स्वारगेट-डेक्कनकडे जाण्यासाठी मावळेआळी मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. यामुळे वाहनांची तसेच दुकाने, बँक, वस्तीभाग, बैठी घरे असल्याने नागरिकांची वर्दळ या मार्गावर असते.

रस्त्यावर पडलेल्या सिमेंट पाइपमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. पर्यायाने वाहतूक कोंडी निर्माण होत असते, प्रामुख्याने सायंकाळी व सकाळी वाहतूक कोंडी होत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. अनेकदा कोंडीमधून वाहन काढत असताना पाइप वाहनाला घासत असतात, यामुळे चारचाकी वाहनांचे नुकसान होते, तर पाइप चुकविण्याच्या नादात वाहने धडकत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
पाइप टाकण्याचे काम चालू असताना खोदाईचे काम पूर्ण करण्यात आले नव्हते. रात्रीच्यावेळी खड्डा न दिसल्याने दुचाकीस्वाराचा अपघात घडून मोठी दुखापत झाली होती. येथील रहिवाशांनी त्या दुचाकीस्वाराला लगेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रशासनाने डागडुजी करत रस्ता दुरुस्त केला. परंतु, सध्या रस्त्यावरील पाइप हे अपघाताला निमंत्रण ठरत आहे. ही अपघाताची
मालिका केव्हा संपणार असा सवाल स्थानिकांनी केला आहे.

कोथरूड काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर म्हणाले, की सिमेंटच्या पाइपमुळे अपघात व वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. विकासकाम करताना नागरिकांना त्रास होणार याची खबरदारी घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे. दोन दिवसांत पाइप हटविण्यात आले नाही तर स्वखर्चाने पालिकेत पाइप पोहचविण्यात येतील, असा इशारादेखील खळदकर यांनी दिला आहेर्.ें

पाण्याची वाहिनी टाकण्याचे काम चालू असून, रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणार याची खबरदारी घेत पाइप इतरत्र ठिकाणी ठेवण्याबाबत सूचना संबंधित विभागाला करण्यात आली आहे.
                                            – अभिजित डोंबे, पथ विभागाचे अधिकारी

Back to top button