पुणे मार्केट यार्डात वाहतूक कोंडी | पुढारी

पुणे मार्केट यार्डात वाहतूक कोंडी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात नेमलेले सुरक्षारक्षक इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे बाजारात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे बाजारात येणार्‍या शेतकरी व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रशासनाचे बाजार आवाराकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या महिनाभरापासून परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. शुक्रवार आणि रविवार पहाटेपासून वाहतूक कोंडी हात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बाजाराच्या प्रवेशद्वारांवर दररोज कोंडी होत असून, तिथे सुरक्षारक्षक उपस्थित नसतात. शेतमाल गाळ्यांवर पोहचण्यास उशीर झाल्यानंतर भावावर परिणाम होतो. परिणामी, शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान होत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरक्षारक्षक उमेदवारांच्या प्रचाराचे काम करीत असल्याने सुरक्षाव्यवस्थेचा ठेका नक्की कोणत्या उमेदवाराचा, अशी चर्चा बाजारात रंगली आहे.

बाजारातील वाहतूक कोंडीचा फटका व्यवहारांवर होतो. उशिरा व्यवहारांमुळे शेतमालाचे भाव घसरून शेतकर्‍यांसह अडते, खरेदीदारांचे आर्थिक नुकसान होते. मात्र, बाजार समिती प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. 

                                                                         – महेश शिर्के, अडतदार

Back to top button