पिंपरी : चापेकर स्मारकाच्या तिसर्‍या टप्प्यासाठी 30 कोटी | पुढारी

पिंपरी : चापेकर स्मारकाच्या तिसर्‍या टप्प्यासाठी 30 कोटी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकर स्मारक बांधण्यात येत आहे. त्यासाठी तिसर्‍या टप्प्यातील कामासाठी 30 कोटींचा सुधारित खर्च आहे. त्या खर्चासह विविध कामांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेची मान्यता दिली. सभा मंगळवारी (दि.21) झाली. या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र कोळंबे, उल्हास जगताप व विभागाचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

चिंचवड येथे चापेकर स्मारकाचे काम सुरू आहे. तिसर्या टप्प्यात बहुउद्देशीय सभागृह, प्रदर्शन हॉल, ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालयाचे हॉल, कॉन्फरन्स हॉल, जिम्नशियम हॉल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 30 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यास आयुक्तांनी मंजुरी दिली.
नवी दिशा योजनेअंतर्गत महिला बचत गटांना सामुदायिक शौचालयाच्या साफसफाईसोबत देखभाल व दुरुस्तीचे कामही देण्यात येणार आहे. कृष्णानगर, चिंचवड येथील स्वामी विवेकानंद क्रीडांगण येथे पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय रायफल व पिस्तूल नेमबाजी प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यसाठी अरुण पाडुळे स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनला दहा वर्षांसाठी देण्यात येणार आहे.

वढू बुद्रुक ता. शिरूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी तीन लाख आर्थिक सहाय देणे. सेक्टर क्रमांक 16 येथील राजे शिवाजीनगरमधील रस्ते अद्यावत पध्दतीने करणेअंतर्गत उर्वरीत विद्युत विषयक कामे करणे. पंतप्रधान आवास योजनेतील आकुर्डीतील गृहप्रकल्पात विद्युतविषयक कामे करणे.

बोपखेल गावठाणापासून खडकीपर्यंत होणार्या नियोजित उड्डाण पुलाच्या मार्गातील अडथळा ठरणार्या महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब खांब व तारा हलविण्यासाठी परवाना व पर्यवेक्षक शुल्क व जागेचे भाडे अदा करणे. सिटीझन परसेप्शन सर्व्हेक्षण जनजागृतीस आलेल्या खर्च अदा करणे. चर्होली टप्पा 1 मधील 21 एमएलडी व टप्पा क्रमांक दोनमधील 20 एमएलडी क्षमतेच्या मैलाशुध्दीकरण केंद्राचे चालन, देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करणे.

चर्होली येथील चोविसावाडी येथे अग्निशामक केंद्र बांधणे, ब क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील जलनि:स्सारण नलिकांची व चेंबर्सची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढणे. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील नियोजित सीएसएसडी विभागाकरिता 30 केव्हीएचे यूपीएस खरेदी करणे. आकुर्डीतील हभप प्रभाकर कुटे रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालयांची अंतर्गंत व बाह्य परिसराची दैनंदिन साफसफाई व स्वच्छता करणे. या कामांसाठी येणार्या खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली.

सहआयुक्त आशादेवी दुरगुडे यांचा सत्कार
मार्च महिन्याच्या अखेरीस सहआयुक्त आशादेवी दुरगुडे या सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्याचा आयुक्त शेखर सिंह यांनी सत्कार केला. दुरगुडे यांची महापालिकेत 38 वर्षे 8 महिने सेवा झाली आहे.

Back to top button