पुणे : प्रिमीयर हँडबॉल लीगमध्ये आता महाराष्ट्र आयर्नमेन संघाची एन्ट्री | पुढारी

पुणे : प्रिमीयर हँडबॉल लीगमध्ये आता महाराष्ट्र आयर्नमेन संघाची एन्ट्री

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रिमियर हँडबॉल लीगच्या बहुप्रतिक्षित पहिल्या हंगामासाठी ‘महाराष्ट्र आयर्नमेन’ या संघाची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्राचा हा संघ ‘पुनीत बालन ग्रुप’चे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या मालकीचा आहे. खो-खो, क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस पाठोपाठ बालन यांनी आता हॅडबॉल खेळातही यामाध्यमातून योगदान दिले आहे.

दिल्लीत मंगळवारी या संघाची घोषणा करण्यात आली. याआधी तीन संघांचे अनावरण करण्यात आले आहे. गर्वित गुजरात, गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेश आणि राजस्थान वोल्व्हरिन अशी या संघांची नावे आहेत. या प्रीमियर हँडबॉल लीगचा पहिला हंगाम 8 जून रोजी सुरू होणार असून तो 25 जून 2023 पर्यंत चालणार आहे. ‘महाराष्ट्र आयर्नमेन संघा’चा मालकी हक्क घेतल्यानंतर बोलताना पुनीत बालन म्हणाले, “खेळ हा भारताच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. आता प्रिमियर हँडबॉल लीगसोबत काम करून हँडबॉल खेळाला आणखी चालना देऊ शकू असा आम्हाला विश्वास आहे. हँडबॉल हा खेळ आधीपासून भारतात लोकप्रिय आहे, आता या खेळाला राष्ट्रीय स्तरावर आणखी नावारुपाला आणायची वेळ आली असून महाराष्ट्राने या स्पर्धांमध्ये नेहमीच चांगली कामगिरी केली आहे.”

‘महाराष्ट्र आयर्नमेन’सह राज्यातील नवीन प्रतिभावंत खेळाडू यानिमित्ताने शोधून काढू शकू असेही बालन यांनी यावेळी सांगितले. तर ब्लूस्पोर्ट एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सीईओ मनू अग्रवाल म्हणाले, “पुनीत बालन यांच्यासारखे सच्चे क्रीडाप्रेमी आमच्या समवेत आले यांचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. त्यांची ही भागीदारी केवळ महाराष्ट्राचा समृद्ध क्रीडा वारसा जपण्याबरोबरच हँडबॉल या खेळाला व्यावसायिकदृष्ट्या एक वेगळे महत्त्व मिळवून देण्यात ते यशस्वी ठरतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान टेनिस प्रीमियर लीगसह बालन यांच्याकडे अल्टीमेट खो-खो, अल्टीमेट टेबल टेनिस आणि टेनिस प्रीमियर लीग यांसारख्या लीगमधील अनेक संघांची मालकी आहे. याशिवाय विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मदत करण्यासाठीही त्यांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे.

Back to top button