पुणे: भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बांबूने मारहाण | पुढारी

पुणे: भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बांबूने मारहाण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: रस्त्यावर भाजी विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना विक्रेत्यांनी हाताने व बांबुने मारहाण करुन जखमी केले. या घटनेत सहायक अतिक्रमण निरीक्षकासह दोघे जण जखमी झाले असून, वारजे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

याबाबत सहायक अतिक्रमण निरीक्षक अंकुश बादाड (वय 31, रा. सासवड) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नवनाथ बाळासाहेब वांजळे (वय 32, रा. विजय दुर्गा कॉलनी, वारजे), रोहन मल्हारी माळशिखरे (वय 18, रा. शिवणे), सुभाष मारुती बोडके (वय 40, रा. शिवणे), गणेश गोरबा हुंबरे (वय 30, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार वारजे येथील एनडीए रोडवरील एनडीए ग्राऊंडच्या बाजुला रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी रविवारी सायंकाळी गाडी घेऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करीत होते. हे पथक एनडीए ग्राऊंडजवळ असले असताना तेथे भाजी विक्री करणाऱ्यांना त्यांनी तेथून निघून जाण्यास सांगितले. तेव्हा आज रविवार असताना कशी काय कारवाई करता, असे त्यांनी विचारणा केली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी भाजीपाला व फळ व्रिकेत्यांचा माल उचलण्यास सुरुवात केली. फिर्यादी हे मोबाईलमध्ये त्याचे शुटींग करत होते. तेव्हा चार ते पाच जणांनी फिर्यादी यांना गाडीतून खाली खेचले. त्यांना हाताने व बांबुने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचे सहकारी निलेश सांबरे हे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण केली. भाजीपाला विक्रेत्यांचा जमाव प्रक्षोभक होऊ लागल्याने हे सर्वजण जीव वाचविण्यासाठी तेथून गाडी घेऊन पळून वारजे पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर दोघांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

Back to top button