संपातही डॉक्टरांनी घडविले माणुसकीचे दर्शन; खडकवासला आरोग्य केंद्रात तीन महिलांची प्रसूती | पुढारी

संपातही डॉक्टरांनी घडविले माणुसकीचे दर्शन; खडकवासला आरोग्य केंद्रात तीन महिलांची प्रसूती

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : सरकारी कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपातही खडकवासला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर, कंत्राटी परिचारिकांनी बाळंतपण, नैसर्गिक आपत्ती, साथ रुग्णांना सेवा पुरवून माणुसकीचे दर्शन घडविले. सोमवारी या आरोग्य केंद्रात तीन कष्टकरी गरोदर महिलांना प्रसूतीसाठी दाखल करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. तसेच, मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आठ जणांसह दिवसभरात शंभराहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले.

गेल्या आठवड्यातही प्रसूतीसाठी आलेल्या एका मजूर महिलेला तातडीने सेवा देऊन सुखरूप बाळंतपण करण्यात आले. राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी झाल्याने ठिकठिकाणची आरोग्य सेवा कोलमडली आहे. अशा कठीण प्रसंगी खडकवासला आरोग्य केंद्रात गोरगरीब, कष्टकर्‍यांना तातडीची आरोग्य सेवा सुरू आहे.

अचानक वेदना होऊ लागल्याने प्रसूतीसाठी खडकवासला येथील आकांक्षा रोहित चव्हाण, धायरी येथील नेहा जयस्वाल व गोर्‍हे बुद्रुक येथील अदिती सागर खिरीड या तीन गरोदर महिलांना बाळंतपणासाठी खडकवासला आरोग्य केंद्रात दुपारी दोनच्या सुमारास दाखल करण्यात आले.

परिचारिका नसल्याने खडकवासला विभागाच्या आशा गट प्रवर्तक सुजाता सोळंकी, गोर्‍हे बुद्रुक येथील प्रीती नानगुडे, खडकवासलातील सविता गायकवाड व धायरीच्या जयश्री शिंदे या आशासेविका या गरोदर महिलांना वाहनांतून आरोग्य केंद्रात घेऊन आल्या. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. खासगी रुग्णालयाची महागडी सेवा परवडत नाही. दुसरीकडे, संपामुळे वेळेवर उपचार मिळतात का नाही? याची काळजी होती. अशा कठीण प्रसंगी देवदूत होऊन डॉक्टर, कंत्राटी नर्स, आशासेविका मदतीला धावून आल्याचे गरोदर महिलांच्या नातेवाइकांनी सांगितले.

आरोग्य केंद्राबद्दल नागरिकांची कृतज्ञता
खडकवासला आरोग्य केंद्रातील सर्व परिचारिका, कर्मचारी संपात सहभागी असल्याने मनुष्यबळ कमी आहे. असे असले तरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शब्दा शहापूरकर व डॉ. दीपक वाघ यांनी राष्ट्रीय आरोग्यसेवा योजनेच्या कंत्राटी परिचारिका स्वाती जाधव व प्रशिक्षणार्थी परिचारिकांच्या मदतीने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्याने नागरिकांकडून कृतज्ञता व्यक्त होत आहे.

रुग्णसेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहे. संपामुळे अत्यवस्थ रुग्णांचे हाल झाल होऊ नयेत, यासाठी प्रसूती व इतर अत्यावश्यक रुग्णांवर वेळेवर उपचार करण्यात येत असून, नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.

                – डॉ. शब्दा शहापूरकर, वैद्यकीय अधिकारी,
                          खडकवासला आरोग्य केंद्र

सकाळपासून तीनही गरोदर मातांना अचानक त्रास होऊ लागला. डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करून घेण्यास सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी स्वतः जातीने लक्ष घालून अत्यावश्यक ते उपचार केले.

                          – प्रीती नानगुडे, आशासेविका

Back to top button