पुणे : ऊसतोडणी मजुरांवर बिबट्याचा हल्ला ; दोन महिला जखमी | पुढारी

पुणे : ऊसतोडणी मजुरांवर बिबट्याचा हल्ला ; दोन महिला जखमी

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  दुचाकीवरून घरी चाललेल्या ऊसतोडणी मजुरावर कळंब (ता. आंबेगाव) येथे बिबट्याने हल्ला केला. त्यात दोन महिला जखमी झाल्या. तसेच दुचाकीचालक व लहान मुलगा गाडीवरून पडल्याने किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी
(दि. 18) रात्री उशिरा घडली. याबाबत माहिती अशी की, ऊसतोडणी कामगार आत्माराम नारायण राठोड (वय 34), छायाबाई आत्माराम राठोड (वय 32), गुरू आत्माराम राठोड (वय 3), मुक्ताबाई प्रवीण जाधव (वय 23, सर्व रा. चांडोली बुद्रुक, ता. आंबेगाव) हे ऊसतोडणी करून चांडोली येथे घरी जात होते.

कळंब गावच्या हद्दीत रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पॉवर हाऊसजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवरील महिलांवर हल्ला केला. मुक्ताबाई जाधव यांचा डावा हात बिबट्याने जबड्यात पकडला, तर छायाबाई राठोड यांच्या मांडीवर पंजा मारला. या हल्यात दोघी जखमी झाल्या. तर गाडीवरून खाली पडून आत्माराम राठोड व त्यांचा मुलगा गुरू राठोड हेदेखील किरकोळ जखमी झाले.

या वेळी रस्त्याने जाणारे दिनकर थोरात, शेखर मावकर, अभिषेक मावकर यांनी त्यांच्या वाहनातून जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे मुख्य शेतकरी दिलीप कुरकुटे, अशोक भोर, महेंद्र वाळुंज, बाळासाहेब कराळे, पशुवैद्यकीय अधिकारी दिनकर थोरात उपस्थित होते.

घटनेची माहिती कळताच शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, देवेंद्रशेठ शहा फाउंडेशनचे अध्यक्ष नीलकंठ काळे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच उपचाराबाबत संबंधित डॉक्टरांना सूचना दिल्या.

Back to top button