पुणे : बिबट्याने नदीकाठचे वास्तव्य सोडले | पुढारी

पुणे : बिबट्याने नदीकाठचे वास्तव्य सोडले

रामदास डोंबे : 

खोर : दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत काही संपता संपेना. बिबट्याचा वाढत असलेला वावर आज नागरिकांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या जिवावर बेतत चालला आहे. तालुक्याच्या उत्तर भागामध्ये भीमा नदीकाठी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने या भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. उसात बिबट्यांचे वास्तव्य असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र, हीच दहशत आता दौंडच्या दक्षिण भागाकडे वळू लागली आहे.

याबाबत माहिती देताना दौंडच्या वनपरीक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे म्हणाल्या की, दौंड तालुक्यात उसाचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर आहे. वन्य प्राणी व नागरिकांमध्ये दहशत असलेला बिबट्या मुख्यत्वे उसाच्या परिसरात राहतो. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यावर ऊसतोड करण्यात आली. परिणामी, भीमा नदीकाठचे उसाचे क्षेत्र कमी झाल्याने बिबट्याला राहायला जागा राहिली नसल्याने हे बिबटे इतरत्र धावू लागले आहेत. जवळपास 8 ते 9 बिबट्यांची दहशत अजूनही दौंड तालुक्यात असल्याचे गोडसे यांनी सांगितले.
दौंड तालुक्याच्या दक्षिण भागात आता एकेकाळी पिण्यासाठी पाणी नव्हते; मात्र आज या भागात पाण्याची मुबलक उपलब्धता झाल्याने या भागातदेखील उसाचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी, उत्तर भागातील नदीकाठचा बिबट्याचा वावर आता दक्षिण भागाकडे वळला आहे. एकंदरतीच तालुक्याच्या दोन्ही बाजूने बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

राहू, पिंपळगाव, खामगाव, कानगाव, नानगाव या भागांतील बिबट्याचा मोर्चा आता यवत, पाटस, देऊळगावगाडा, भांडगाव, खोर या भागांकडे वळला गेला आहे. डोंगर माथ्यावर उसाचे क्षेत्र करण्यात आले असल्याने आता बिबट्याची दहशत पुणे-सोलापूर महामार्गांच्या दिशेने डोके वर काढू लागली आहे. दरम्यान, दौंडचे आमदार राहुल कुल यांनीदेखील विधानसभेत बिबट्यांचे नागरिकांवर होणारे हल्ले व पाळीव प्राण्याच्या बाबतीतील संरक्षण याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

Back to top button