पुणे : अवकाळीच्या नुकसानभरपाईपोटी 58 कोटींची मदत शक्य | पुढारी

पुणे : अवकाळीच्या नुकसानभरपाईपोटी 58 कोटींची मदत शक्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात मार्च महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात आतापर्यंत अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे 38 हजार हेक्टरवरील शेती व फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यापोटी शेतकर्‍यांना सध्याच्या नियमांप्रमाणे नुकसान भरपाई द्यायची झाल्यास ती सुमारे 58 कोटी रुपयांइतकी मिळू शकते, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली. रब्बी हंगामातील पिके आणि द्राक्षे, आंबा, केळी, पपई, संत्रा, लिंबू आदींचे अवकाळीमुळे नुकसान झालेले आहे.

अवकाळीमुळे नुकसान झालेल्यामध्ये सध्याच्या शासनाच्या नियमांप्रमाणे हेक्टरी मंजूर मदत रकमेचा विचार करता जिरायत क्षेत्रासाठी 6 हजार 800 रुपये, बागायत क्षेत्रासाठी 13 हजार 500 रुपये आणि फळपिकांसाठी 18 हजार रुपये आहे. त्यामध्ये सरासरी 15 हजार रुपयांची मदत अपेक्षित धरली, तरी सुमारे 58 कोटी रुपये नुकसानभरपाई शेतकर्‍यांना मिळू शकते, असे अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हानिहाय झालेले पिकांचे नुकसान पाहता नाशिक जिल्ह्यात 120 हेक्टर, धुळे जिल्ह्यात 861 हेक्टर, नंदुरबार जिल्ह्यात 61 हेक्टर, जळगाव जिल्ह्यात 563 हेक्टर, अहमदनगरमध्ये 10 हेक्टर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 121 हेक्टर मिळून 1 हजार 736 हेक्टरवरील पिकांचे व फळबागांचे पुन्हा नुकसान झालेले आहे. पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची दाट शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button