पुणे : मोगरा शेतीतून साधताहेत आर्थिक प्रगती ; वाल्हे परिसरात शेतकर्‍यांचा अभिनव प्रयोग | पुढारी

पुणे : मोगरा शेतीतून साधताहेत आर्थिक प्रगती ; वाल्हे परिसरात शेतकर्‍यांचा अभिनव प्रयोग

समीर भुजबळ : 

वाल्हे : अलीकडे शेतीमध्ये मोठा बदल पहावयास मिळत आहे. पारंपरिक पिकांऐवजी शेतकरी बांधवांनी आता नगदी पिकांची लागवड सुरू केली आहे. मागील काही वर्षांपासून पुरंदर तालुक्यातील अनेक शेतकरी फुलशेतीकडेदेखील वळू लागले आहेत. खर्च आणि कमी कष्ट तसेच शाश्वत उत्पन्न असे फूलशेतीचे समीकरण लक्षात घेऊन वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील बहुतांश शेतकर्‍यांनी विविध फुलांच्या लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे.

वाल्हे परिसरातील शेतकरी झेंडू, गुलछडी, मोगरा या फूलशेतीच्या माध्यमातून चांगली कमाई करीत आहेत. वाल्हे येथील युवक शेतकरी सागर भुजबळ, अनिल राऊत, उमेश राऊत, ज्ञानेश्वर राऊत यांनीदेखील पारंपरिक पिकांना छेद देत मोगरा या फूलपिकाची लागवड केली आहे. मोगरा फूलपिकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची एकदा लागवड केल्यानंतर तब्बल 10 वर्षे यापासून उत्पादन मिळवता येते. या पिकातून वर्षभर टप्प्याटप्प्याने उत्पादन मिळते. सागर भुजबळ यांनी आपल्या दहा गुंठे शेतजमिनीवर मोगर्‍याची लागवड केली असून, त्यत्पासून त्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे.

मोगरा फुलांची आता नुकतीच तोडणी सुरू झाली आहे. अजूनही थंडीचे प्रमाण असल्याने यातून त्यांना कमी उत्पन्न म्हणजेच दिवसाला तीन ते चार किलो फुले मिळत आहेत. पुढील काही दिवसात थंडी कमी होऊन ऊन वाढल्यानंतर याच क्षेत्रातून दिवसाला 7 ते 8 किलोपर्यंत उत्पादन मिळेल.

                                                       -सागर भुजबळ, फूल उत्पादक शेतकरी

प्रयोगातून आर्थिक प्रगती शक्य

पुण्याच्या बाजारात या मोगर्‍याला 250 ते 300 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे. यामुळे त्यांना मोगरा शेतीतून चांगली कमाई होत आहे. शेतकर्‍यांना पारंपरिक पिकांच्या शेतीत अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. परिणामी, शेतकर्‍यांनी पीक पद्धतीत बदल करत असा नवीन आणि शाश्वत उत्पन्न देणारा प्रयोग केला, तर शेतकरी बांधवांना सहजरीत्या आर्थिक प्रगती साधता येणे शक्य होऊ शकते, हेच या प्रयोगातून आज सिद्ध होत आहे.

शेतकरी करतात व्यावसायिक शेती
सध्याच्या काळात परंपरागत शेती सोडून इतर शेती व्यवसायाकडे वळण्याची गरज असल्याने वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील शेतकर्‍यांनी फुलशेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत कळीची तोडणी केली जाते. नुकतीच मोगरा तोडणीस सुरुवात झाली असून, दररोज तीन ते चार किलो उत्पादन निघत आहे, तसेच लग्नसराईत मागणी असल्याने बाजारभावही चांगला मिळत आहे.

शेतीची दर वर्षी मशागत नाही
या पिकातून त्यांना कमी पाण्यात अन् कमी कष्टात चांगली कमाई होत आहे. याची एकदा लागवड केली की 10 वर्षे उत्पादन मिळते, यामुळे या पिकासाठी दर वर्षी जमिनीची मशागत करावी लागत नाही. परिणामी, खर्च वाचतो, मेहनत कमी करावी लागते, शिवाय मोगर्‍याच्या फुलाला बाजारात कायमच मागणी असते.

Back to top button