पुणे : नदीकाठ सुधारणा प्रकल्प झाडांच्या मुळावर ! 6 हजार झाडांवर कुर्‍हाड चालणार… | पुढारी

पुणे : नदीकाठ सुधारणा प्रकल्प झाडांच्या मुळावर ! 6 हजार झाडांवर कुर्‍हाड चालणार...

पांडुरंग सांडभोर : 

पुणे : महापालिकेच्या मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाच्या पहिल्या दोन टप्प्यांतील कामांसाठी तब्बल 6 हजारांहून अधिक वृक्षांवर कुर्‍हाड कोसळणार आहे. या प्रकल्पाच्या खोदाईत आणि बांंधकामात अडथळा ठरणार्‍या 3 हजार 249 वृक्षांना पूर्णत: काढण्याचा, तर 2 हजार 813 वृक्ष काढून त्यांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानेच वृक्षसंवर्धन समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत पुणे महापालिकेने पाच हजार कोटींचा मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्प हाती घेतला आहे. एकूण 11 टप्प्यांत या प्रकल्पाचे काम होणार आहे. त्यात संगम बि—ज ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा बि—ज, या एकूण तीन टप्प्यांतील कामांना गतवर्षी सुरुवात झाली. आता या तीन टप्प्यांतील कामांसाठी मुळा-मुठा नदीकाठच्या दोन्ही बाजूंना असलेले तब्बल 6 हजार 62 वृक्ष काढण्याचा प्रस्ताव वृक्षसंवर्धन समितीपुढे महापालिका प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे. यामध्ये 3 हजार 249 वृक्ष पूर्णपणे काढून टाकण्याचे, तर 2 हजार 813 वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव आला आहे.

महापालिकेच्याच प्रकल्प विभागाकडून शिवाजीनगर-घोले रोड, ढोले पाटील रोड आणि नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे हे वृक्ष काढण्यासंबंधीचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यावर या क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून तज्ज्ञ सल्लागार समितीच्या शिफारशींनुसार वृक्षसंवर्धन समितीचे प्रमुख असलेल्या आयुक्तांच्या अंतिम मंजुरीसाठी ठेवले आहेत. मात्र, दोनशेपेक्षा अधिक वृक्ष तोडायचे असतील, तर त्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागांतर्गत येणार्‍या वृक्ष प्राधिकरण विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे नदीकाठ संवर्धनाच्या नावाखाली या सहा हजार वृक्षांची कत्तल करायची की नाही, यासंबंधीचा निर्णय सरकारच घेऊ शकणार आहे.

काय आहेत तज्ज्ञांच्या शिफारशी?
नदीकाठ सुधारणा प्रकल्पात जे 6 हजार वृक्ष बाधित होत आहेत, ते विविध पक्ष्यांसाठी नैसर्गिक पध्दतीने अधिवास निर्माण करीत आहेत. त्यांच्यासभोवताली सलीम अली पक्षिअभयारण्य, नाईक बेट यांसारखी जैवविविधतेने समृद्ध असलेली ठिकाणे आहेत. त्यामुळे बाधित वृक्षांचे संवर्धन केल्यास पर्यावरणाची हानी टाळता येणे शक्य आहे. मात्र, एकीकडे तब्बल सव्वातीन हजार वृक्ष पूर्णपणे काढावे लागणार असल्याने पर्यावरणाची हानी टाळणे कसे शक्य होणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, जवळपास पावणेतीन हजार वृक्षांचे जरी पुनर्रोपण केले तरी त्यामधील किती वृक्ष प्रत्यक्षात टिकणार, असाही प्रश्न आहे.

या वृक्षांची होणार कत्तल
ज्या सहा हजार वृक्षांची कत्तल होणार आहे, त्यामधील 90 टक्क्यांहून अधिक वृक्ष अत्यंत देशी जातीची व जुनी आहेत. नैसर्गिक पध्दतीने तयार झालेली ही गर्द हिरवी वनराई आहे. त्यात वड, चिंच, आंबा, पळस, खैर, चंदन, गुलमोहर, बाभूळ, सुबाभूळ, जंगली, रेनट्री, कडुनिंब, करंज, चाफा, बंकद, शिरीष, काटे सावर, आवळा, घोळ, आपटा, शिवन, बहाबा अशा जातींचे वृक्ष असून, यात फळांच्या आणि फुलांच्या वृक्षांचा समावेश आहे.

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या नावाखाली एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने वृक्ष तोडणे बेकायदेशीर व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे पर्यावरणावर घाला घालून अशा पद्धतीने वृक्षतोड होणार असेल, तर आमचा त्यास  विरोध असेल.

                                              – नंदकुमार मंडोरा, माजी वृक्षसंवर्धन समिती सदस्य

नदीपात्रातील जे वृक्ष काढण्याचा प्रस्ताव आहे, त्यात प्रामुख्याने छोटे वृक्ष आणि झुडपांची संख्या अधिक आहे. तुलनेने मोठ्या वृक्षांची संख्या अत्यंत कमी आहे, तसेच जे काही वृक्ष काढण्यात येणार आहेत, त्याबदल्यात निकषानुसार पुन्हा वृक्षारोपणही केले जाणार आहे.

                                                – प्रशांत वाघमारे, मुख्य नगर अभियंता, पुणे मनपा

Back to top button