तळेगाव दाभाडे : मावळातील वाहनांना 27 मार्चपर्यंत टोलमधून सूट | पुढारी

तळेगाव दाभाडे : मावळातील वाहनांना 27 मार्चपर्यंत टोलमधून सूट

तळेगाव दाभाडे : सोमाटणे टोलनाका बंद करा, या कृती समितीच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 27 मार्चला अधिवेशन संपल्यानंतर यासंदर्भात मुख्यमंत्री व सोमाटणे टोलनाका हटाव कृती समिती यांच्यामध्ये बैठक पार पडेल व या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. तसेच, 27 तारखेपर्यंत मावळ तालुक्यातील वाहनांना या टोलमधून सूट मिळणार असल्याचे राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून घोषणा झाल्यानंतर मंगळवारी किशोर आवारे यांच्यासह अन्य उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सोडले आहे.

या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, राष्ट्रवादीचे गणेश खांडगे, जिल्हा किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, किसान मोर्चाचे सचिव संतोष दाभाडे पाटील, राष्ट्रवादीचे तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे, रवींद्र माने आदी उपस्थित होते.

सोमाटणे टोलनाका कृती समितीच्या वतीने किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी मागील चार दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मंगळवारी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीने सोडण्यास यश आले. जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव स्टेशन येथील श्री विठ्ठल मंदिरात सुशील सैंदाणे, राजेंद्र जांभुळकर, जमीर नालबंद, नीलेश पारगे, प्रशांत मराठे, योगेश पारगे आदी उपोषणाला बसले होते.

गेल्या तीन दिवसांत मावळ तालुक्यातून उपोषणाला पाठिंबा दर्शविला होता. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे यांनी मध्यस्थीच्या भूमिकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा केली. त्यानुसार, मंगळवार विधानसभा अधिवेशन सुरू असतानादेखील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सरकारच्या वतीने उपस्थित राहून टोलनाका बंद व्हावा, याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन अधिवेशनानंतर बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आवाहन केले.

आंदोलनकर्त्यांनी राज्य शासनाकडे एमएसआरडीसीकडे सोमाटणे टोलनाका बेकायदेशीर आहे, असे पुरावे दिल्यानंतरदेखील मंत्र्यांनी टोलनाका बंदच्याबाबत समाधानकारक घोषणा केली नाही. अधिवेशनानंतर या टोलनाक्याबाबत राज्य शासनाबरोबर होणार्‍या बैठकीमध्ये हा अनाधिकृत टोलनाका कायम बंद करावा. तसेच, जोपर्यंत राज्य शासनाबरोबर बैठक होत नाही, तोपर्यंत या सोमाटणे टोल नाक्यावरून टोल वसूल करू नये.

                                                         – सुनील शेळके, आमदार

जोपर्यंत राज्य शासन, सोमाटणे टोलनाका कृती समिती व उपोषणकर्त्यांची बैठक होत नाही, तोपर्यंत चारचाकी वाहने व मालवाहतूक करणारी वाहने हे टोलनाक्यावर कोणताही टोल भरणार नाहीत.
                                            – रवींद्र चव्हाण, मंत्री सार्वजनिक बांधकाम

Back to top button