पुणे : रेल्वे फाटक ठरतेय डोकेदुखी !… वाहतूक कोंडीची समस्या | पुढारी

पुणे : रेल्वे फाटक ठरतेय डोकेदुखी !... वाहतूक कोंडीची समस्या

समीर सय्यद

पुणे : दर दहा मिनिटांनी येणार्‍या रेल्वेमुळे बंद होणारे फाटक… रेल्वे गेटच्या परिसरात काही क्षणांतच लागणार्‍या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा… कागदावरच असलेला बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपूल… भाजी मार्केटची झालेली दुरवस्था… आदी समस्यांच्या कचाट्यात पुणे कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचा घोरपडीतील वॉर्ड क्रमांक सात अडकला आहे. कॅन्टोन्मेन्ट हद्दीतील भौगोलिकदृष्ट्या आणि मतदारसंख्येत सर्वाधिक मोठा वॉर्ड म्हणून घोरपडी वॉर्ड ओळखला जातो. घोरपडी गाव, घोरपडी बाजार, चिमटा वस्ती या नागरी वस्ती; तसेच रेसकोर्स, व्हिक्टोरिया रोड, नेपिअर रोड, खान रोड परिसराचा या वॉर्डात समावेश होतो.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात जाताना मध्येच येणार्‍या रेल्वे फाटकामुळे होणारी वाहतूक कोंडी वॉर्डाच्या सर्वांगीण विकासातील अडथळा ठरत आहे. वाढीव ’एफएसआय’अभावी घोरपडी गावठाणातील इमारतींचा रखडलेला पुनर्विकास आणि मालमत्ता हस्तांतराची किचकट प्रक्रिया हा घोरपडी गावठाणातील प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. घोरपडी बाजार, घोरपडी गाव, फिलिप चाळ परिसरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे.

दररोज रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल बांधता येणार नाही, असे सांगितले आहे. तसे नसेल तर भुयारी मार्ग केल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल. वॉर्डात अस्वच्छता पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

                        जयकुमार राघवाचारी, सामाजिक कार्यकर्ते.

गेल्या सात वर्षांत वॉर्डाच्या विकासाला मोठा ब्रेक लागला असून, रेल्वे पूल हा त्यातील महत्त्वाचा अडथळा ठरत आहे. भाजी मार्केटची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतेची समस्याही गंभीर झाली असून, त्याकडे बोर्ड प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

                    संतोष कवडे, माजी सदस्य घोरपडी.

Back to top button