पुणे : आजपासून तीन दिवस बहुतांश राज्यांत पाऊस; देशाच्या चारही बाजूंनी बाष्पयुक्त ढगांची गर्दी | पुढारी

पुणे : आजपासून तीन दिवस बहुतांश राज्यांत पाऊस; देशाच्या चारही बाजूंनी बाष्पयुक्त ढगांची गर्दी

पुणे : हिमालयात सक्रिय झालेला पश्चिमी चक्रवात व आसाममध्ये हवेची चक्रीय स्थिती, यासह देशाच्या चहुबाजूंनी झालेली बाष्पयुक्त ढगांची गर्दी, यामुळे देशात काश्मीर ते तामिळनाडूपर्यंत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दि. 18 मार्चपर्यंत हा पाऊस महाराष्ट्रातही राहील. हवामान विभागाच्या वतीने सॅटेलाईटचे चित्र मंगळवारी जारी करण्यात आले. यात देशाच्या चारही बाजूंनी बाष्पयुक्त ढगांची गर्दी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हिमालयात पश्चिमी चक्रवात तयार झाल्याने त्या भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. आसाममध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने तामिळनाडूपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्वच भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा इशारा मंगळवारी पुन्हा देण्यात आला आहे.

नेमके काय कारण…
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, समुद्र सपाटीपासून 4 ते 5 किमी उंचीवर असणारा देशाचा 40 टक्के भूभाग व्यापत पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा हवेच्या कमी दाबाचा आस दिसत आहे. तसेच, त्याच्या खालच्या पातळीतून उलट दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे तसेच बंगालच्या उपसागरातून आर्द्रतायुक्त आस तयार झाला आहे. गुरुवारी 16 रोजी या दोन्हींचा मिलाफ महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळे 16 व 17 रोजी पावसाचा जोर जास्त राहील.

Back to top button