खबरदार! कबुतरांना खायला घालताय, 500 रुपये मोजा! | पुढारी

खबरदार! कबुतरांना खायला घालताय, 500 रुपये मोजा!

आशिष देशमुख

पुणे : हवेमुळे पसरणारी कबुतरांची पिसे अन् विष्ठा, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे कायमच बोलले जाते. पण, तरीही भयावह वेगाने वाढणार्‍या या पारव्यांना भूतदया या नावाखाली दाणे टाकण्याचे प्रकार काही थांबायला तयार नाहीत. ठाणे महापालिकेने अशा अतिउत्साही पक्षिप्रेमींना पाचशे रुपयांचा दंड ठोठावणे सुरू केल्यानंतर आता पुणे महापालिकेलाही जाग आली आहे. महापालिका आता सार्वजनिक उद्याने आणि इतर ठिकाणांची पाहणी करणार असून, कबुतरांना खायला घालणार्‍यांना पाचशे रुपयांचा दंड करणार आहे.

कबुतरांना दाणे खाऊ घालणार्‍यांना 500 रुपयांचा दंड करण्यात येईल, असा इशारा देणारे पोस्टर्स ठाणे महापालिकेने शहरभर लावले आहेत. त्यामुळे कबुतरांचा विषय पुन्हा राज्यभर ऐरणीवर आला आहे. पुणे शहरातही कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक अपार्टमेंटमध्ये घरटी करून राहणार्‍या कबुतरांमुळे मोठी अस्वच्छता होते. शहरात अनेक चौकांत कबुतरांना दररोज ज्वारीचे दाणे भरवले जातात, त्यामुळे अनेक स्पॉट ‘कबुतर बेटे’ म्हणून प्रसिध्द आहेत.

यात वृध्देश्वर-सिध्देश्वर घाट, शनिवार, नारायण पेठ घाटासह नदीकाठच्या सर्वच घाटांवर कबुतरांना लोक ज्वारीचे दाणे खाऊ घालतात. सारसबाग चौक, रास्ता पेठेतील पुतळ्यांजवळ दररोज शेकडोंच्या संख्येने दाणे खाण्यासाठी पक्ष्यांचे थवे येतात. ठाणे शहरासारखाच पुण्यातदेखील न्युमोनियाचे आजार कबुतरांपासून माणसांना होऊ शकतो, त्यामुळे पक्षितज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

महापालिकेने चर्चा घडवून आणावी…
शहरातील पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले की, पक्ष्यांना दाणे खाऊ घालून भूतदया करणे वाईट नाही; परंतु त्यांच्यामुळे त्रास होत असेल, अनेक आजार होत ,असतील तर त्यावर नियंत्रण आणले पाहिजे; कारण पुणे शहरात सर्वत्र कबुतरांची संख्या खूप आहे. कबुतरांना लोक दाणे भरवतात, तेथे कबुतरांचे थवेच्या थवे येतात. पाचशे ते हजार पक्षी एकाच वेळी येतात. अशा वेळी माणसांना श्वसनाच्या विविध आजारांचा धोका कबुतरांकडून संभवतो. तसेच विमान उड्डाणात कबुतरांचा मोठा अडथळा होतो. यावर महापालिकेने चर्चा घडवून त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा.

खायला दिल्यानेच वाढतेय पैदास…
पक्षितज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणे खूप जास्त प्रमाणात खायला देतात. त्यामुळे त्यांची तब्येत धष्ट-पुष्ट होऊन त्यांची पैदास वाढण्यास मदत होते.

इतर पक्ष्यांना मिळत नाही अन्न..
कबुतर आणि पारवे हे पक्षी आकाराने मोठे असतात. तेच अन्न खाण्यास जास्त संख्येने येत असल्याने तेथे लहान पक्ष्यांना अन्न मिळत नाही. हे दोन्ही पक्षी आक्रमक असल्याने लहान पक्ष्यांना त्यांच्या सोबत येणे कठीण होते. त्यामुळे शहरातील पक्षिजीवनाचा समतोलही ढासळला आहे.

पक्ष्यांच्या विष्ठेमुळे, पंखातून निघणार्‍या बारीक पावडरमुळे (पावडर डाऊन) माणसाला फुप्फुसाचे अनेक आजार होण्याचा धोका आहे. यात प्रामुख्याने न्युमोकेनिओसिस, पिस्टोप्लाझ्मोसिस हे आजार होतात. जे लोक पक्ष्यांना रोज खायला घालतात त्यांच्यासह जेवणाचे ढाबे जेथे आहेत तेथे पक्षीपालन होते. त्यांना या आजारांचा धोका आहे.

                                    – डॉ. सतीश पांडे, फिजिशियन व पक्षितज्ज्ञ

अनेक नागरिकांच्या तक्रारी याबाबत आल्याने शुक्रवारीच याबाबत आरोग्य निरीक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत. ठाणे महापालिकेप्रमाणे पुणे शहरात देखील अशा सर्व ठिकाणचा सर्व्हे करून त्यांना जागेवरच 500 रुपयांचा दंड केला जाणार आहे. या कामाचा अहवाल दर पंधरा दिवसांनी घेतला जाईल.

                             – डॉ. कल्पना बळीवंत, आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.

Back to top button