पुणे : पूर्व भागाची काँग्रेसला खंबीर साथ | पुढारी

पुणे : पूर्व भागाची काँग्रेसला खंबीर साथ

सुनील माळी

पुणे : हक्काच्या सदाशिव-शनिवार-नारायण पेठांमध्ये अपेक्षित असलेले मोठे मताधिक्य मिळविण्यात भारतीय जनता पक्षाला आलेले अपयश आणि पूर्व भागातील मतदारांनी काँग्रेसच्या झोळीत भरभरून टाकलेले मतांचे माप, हीच कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील रवींद्र धंगेकर यांच्या यशाची प्रमुख कारणे म्हणता येतील. विभागनिहाय मतदान कसकसे झाले, त्याची बारकाईने तपासणी केल्यानंतर पूर्व भाग खंबीरपणे काँग्रेसच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसून येत आहे.

मते-37 हजार 247
प्रभाग 15
सदाशिव पेठ-शनिवार पेठ                                                                                                                                              रवींद्र धंगेकर – 14 हजार 557
हेमंत रासने – 21 हजार 763
रासने यांचे मताधिक्य – 7206

कसबा विधानसभेच्या क्षेत्रात येणार्‍या सहा प्रभागांपैकी सदाशिव-शनिवार पेठ हा प्रभाग 15 चा भाग गेली अनेक दशके आधीच्या जनसंघाच्या आणि आताच्या भाजपच्या मागे राहतो, हे सर्वज्ञात आहे. तसे याही निवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना या भागात मोठे मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा त्या पक्षाला होती. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांना 18 हजारांचे मताधिक्य याच प्रभागाने दिले होते. ब—ाह्मण समाजाला नाकारल्याचा तसेच प्रचाराच्या आक्षेपार्ह पद्धतीने आलेल्या अस्वस्थतेचा परिणाम झाल्याने भाजपचे मताधिक्य 7206 पर्यंत घसरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर यांची बंडखोरी वेळीच रोखण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाल्याने या आघाडीची प्रभागातील मूळ मतेही फुटली नाहीत.

मते – 27 हजार 762
प्रभाग 17 
रास्ता पेठ-रविवार पेठ
रवींद्र धंगेकर 16 हजार 714
हेमंत रासने 10 हजार 639
धंगेकर यांचे मताधिक्य – 6 हजार 75

धंगेकर यांना सर्वाधिक मताधिक्य या प्रभागाने दिले. व्यापारी, बहुजन तसेच बुरूड, लोहार, चर्मकार, काशीकापडी, मुस्लिम अशा संमिश्र समाजाचा हा भाग आहे. काँग्रेस एकसंध असल्यापासून काही घराण्यांतील व्यक्ती त्या पक्षाकडून निवडून येत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून एकमेकांविरुद्ध लढणारे या पक्षांचे प्रतिनिधी या निवडणुकीत एकत्र एकाच चिन्हाचा प्रचार करताना दिसत होते. वीरेंद्र किराड तसेच वनराज आंदेकर यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच इतरांनीही धंगेकर यांच्या प्रचाराचे काम केले. या संयुक्त प्रचाराला रोखणे भाजपला जमू शकले नाही.

मते-19 हजार 73
प्रभाग 29
नवी पेठ-पर्वती
रवींद्र धंगेकर-10 हजार 176
हेमंत रासने-8 हजार 498
धंगेकर यांचे मताधिक्य-1 हजार 678

दत्तवाडीपासून विजयानगर कॉलनीपर्यंतचा भाग या प्रभागात येतो. मुख्यत: दत्तवाडीतील मतांवर दोन्ही पक्षांचे लक्ष होते आणि भाजपला येथून मताधिक्य मिळण्याची अपेक्षा होती. मराठा तसेच इतर बहुजन यांचे प्राबल्य या मतदारसंघात असल्याने त्यांच्या कलावर मताधिक्य अवलंबून होते. पर्वती मतदारसंघातील भाजपची कुमकही रासने यांच्या बाजूने काम करताना दिसत होती. धंगेकर यांना फारसे मोठे मताधिक्य मिळाले नाही, तरी भाजपला रोखण्यात ते आणि आघाडी यशस्वी झाली, याचे कारण हा मतदार त्यांच्याकडे झुकला, हे होते.

मते-16 हजार 897
प्रभाग 16
कसबा पेठ-सोमवार पेठ
रवींद्र धंगेकर-10 हजार 594
हेमंत रासने-6 हजार 33
धंगेकर यांचे मताधिक्य – 4 हजार 561

धंगेकर निवडून आलेला हा प्रभाग असल्याने त्यांना येथे मोठे मताधिक्य अपेक्षित होते आणि त्यानुसारच पडलेल्या एकूण मतांच्या 60 टक्क्यांवर मते त्यांना मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेच्या संदीप गायकवाड यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची फळी या प्रभागात आहे. धंगेकर यांचे मताधिक्य कमीत कमी राहील, यासाठी भाजपने रचलेल्या चाली अयशस्वी ठरल्या. जुन्या गावगाड्याच्या खुणा जपणार्‍या या भागातील मूळ आलुतेदार-बलुतेदार म्हणजेच इतर मागासवर्गीयांना धंगेकर आपला माणूस वाटणे सहजशक्य होते.

मते-37 हजार 247
रवींद्र धंगेकर-15 हजार 360
हेमंत रासने-10 हजार 880
धंगेकर यांचे मताधिक्य – 4 हजार 480

महात्मा फुले यांच्यापासून सुरू झालेली सामाजिक कामाची परंपरा या भागाला आहे. समाजवादी विचारसरणी रुजल्याने एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, डॉ. बाबा आढाव यांचा वैचारिक वारसा असलेले मतदार येथे आहेत. महापालिकेची 7, 8 तसेच 9 क्रमांकाची वसाहतही येथे आहे. तसेच मोमीनपुरा, चांदतारा चौक, घोरपडे पेठ या भागांत मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहेत. भाजपला विरोध करण्याच्या निर्णयातूनच मुस्लिम समाजाने दुपारनंतर मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या होत्या. त्यांना रोखण्यासाठी आपले नगरसेवक उपयोगी पडतील, हा भाजपचा भरवसा फोल ठरला.

मते-10 हजार 442
रवींद्र धंगेकर-5 हजार 793
हेमंत रासने-4 हजार 431
धंगेकर यांचे मताधिक्य – 1 हजार 362

या प्रभागात मातंग आणि मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे. तरीही धंगेकर यांना अपेक्षेएवढे मताधिक्य मिळाले नाही. लोहियानगरमध्ये भाजपचे आमदार सुनील कांबळे, त्यांचे बंधू माजी मंत्री दिलीप कांबळे यांचा संपर्क असल्याने त्यांनी पक्षाला चांगली मते मिळवून दिली. तरीही काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे, त्यांचे चिरंजीव अविनाश तसेच इतर कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करून पक्षाला तेराशे मतांची आघाडी मिळवून दिली.

चाणक्य परदेशात
कोणत्याही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक पक्षाकडे त्या मतदारसंघाची खडान् खडा माहिती असणारे चाणक्य असतात. त्यांना विश्वासात घेऊन त्यांची मदत घेणे, त्यांच्याकडे ठरावीक जबाबदारी सोपविणे अपेक्षित असते. भाजपच्या गिरीश बापट यांच्या अनेक निवडणुकांची सूत्रे हलविणारे असे एक चाणक्य न दिसल्याने त्यांच्याबाबत विचारणा केली असता ते परदेशात गेल्याचे उत्तर देण्यात आले होते. तसेच, मतदारसंघाशी संबंध आणि माहिती नसलेल्या शहरातील इतर भागांतील काही स्थानिक नेत्यांनाच प्रचारात घेण्यात आल्याचे दिसून आले. नगरसेवकांवर नजर ठेवण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले होते, असे पक्षाच्या काही वरिष्ठांनी सांगितले.

Back to top button