पिंपरी : अंगणवाडी सेविकांवर कामाचा बोजा ; दोन्ही पद्धतीने काम करताना होतेय दमछाक | पुढारी

पिंपरी : अंगणवाडी सेविकांवर कामाचा बोजा ; दोन्ही पद्धतीने काम करताना होतेय दमछाक

वर्षा कांबळे : 

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी सेविका यापूर्वी पारंपरिक पद्धतीने सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत होत्या. सध्या अंगणवाडी सेविकांना रजिस्टर नोंदी आणि ऑनलाइन नोंदीसाठी पोषण ट्रॅकर अ‍ॅप देण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाइन व ऑफलाइन असा दोन्ही कामांचा बोजा अंगणवाडी सेविकांवर आहे. चार वर्षांपूर्वी त्यांना ऑनलाइन नोंद करण्यासाठी स्मार्ट फोन देण्यात आले. अंगणवाडीसेविकांना पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजनांच्या नोंदी, लसीकरण यांसह दैनंदिन कामकाजाचा आढावा ऑनलाइन कसा द्यायचा, याचे प्रशिक्षणही देण्यात आले होते.

या सर्व कामाचा अहवाल अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागतो. ही नोंद ऑनलाइन झाल्यावर अंगणवाडी सेविकांचे काम कमी होणार होते. मात्र, हे अ‍ॅप मराठीत नसल्याने बहुतांश अंगणवाडी सेविकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

स्वत:च्या स्मार्टफोनमधून काम
शासनाने दिलेल्या स्मार्ट फोनच्या तक्रारीमुळे अंगणवाडी सेविकांना नवीन स्मार्ट फोन देण्याच्या आश्वासनावर अंगणवाडीताईंनी स्मार्ट फोन शासनाकडे जमा केले. दोन वर्षांनंतरही अद्याप स्मार्ट फोन मिळाले नसल्यामुळे अंगणवाडीताईला स्वत:च्या स्मार्टफोनमधून पदरचे नेट खर्च करून पोषण ट्रॅकर आणि इतर कामे करावी लागत आहेत.

अहवाल सादर करण्यास वाढीव खर्च
अंगणवाडी सेविकेकडून वार्षिक अहवाल शासनाकडे पाठविला जातो. यासाठी सर्व महिन्याचा अहवाल एका पेनड्राईव्हमध्ये भरून तो मराठीतून इंग्रजीमध्ये भाषांतरीत करावा लागतो. यासाठी अंगणवाडी सेविकेला पाचशे ते सातशे रुपये खर्च येतो.

इंग्रजीचे अल्प ज्ञान, अ‍ॅप हवे मराठीत
अंगणवाडी सेविका यापूर्वी पारंपरिक पद्धतीने सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत होत्या.
अंगणवाडी सेविकांना सर्व कामांची एकूण 16 रजिस्टर्समध्ये नोंद ठेवणे व त्यांचा मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक अहवाल द्यावा लागतो. यासाठी पोषण ट्रॅकर अ‍ॅप शासनाने दिले आहे. आतापर्यंत कागदोपत्री ऑफलाईन चालणारे काम हे ऑनलाइन होणार म्हणून अंगणवाडीसेविका समाधानी होत्या. मात्र, पोषण ट्रॅकर मराठीतून देण्याचे ठरले होते. सुरुवातीला इंग्रजीतून काम करा, नंतर मराठीत हे अ‍ॅप उपलब्ध केले केले जाईल, असे सांगण्यात आले. बहुतांश अंगणवाडी सेविकांना इंग्रजीचे ज्ञान नसल्याने पोषण ट्रॅकर अ‍ॅप घरातील कोणाकडून तरी भरून द्यावा लागत आहे.

पोषण ट्रॅकर अ‍ॅप चालविण्यासाठी साधन पाहिजे. ते अ‍ॅप अंशत: मराठीत आहे. त्याचा बराचसा भाग इंग्रजीमधून आहे. त्याच्याविषयी आम्ही उच्च न्यायालयात केस दाखल केली आहे. कोर्टानेदेखील अ‍ॅप मराठीत करा, असे सांगितले आहे. या अ‍ॅपला बरीच जागा लागत असल्याने मोबाईल हँग होतात. त्यामुळे मोबाईल खराब झाले आहेत.
              – नितीन पवार, अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र, पुणे

Back to top button