खोर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, गणेश बनला मुख्याधिकारी | पुढारी

खोर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, गणेश बनला मुख्याधिकारी

खोर(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खोर येथील गणेश संपत चौधरी या 28 वर्षीय तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यातून तब्बल 66 क्रमांक मिळवून गणेश मुख्याधिकारीपदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. गणेश हा दौंड तालुक्यातील खोर येथील रहिवासी आहे. मात्र, शेती व्यवसायाच्या निमित्ताने त्याचे कुटुंबीय कानगाव या ठिकाणी स्थायिक झाले.

त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, कुटुंबाला जेमतेम शेती व्यवसायावरच आपली उपजीविका करावी लागत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गणेशला शैक्षणिक क्षेत्रात अनेक अडचणी आल्या. त्याने इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधरीवाडी येथे घेतले. त्यानंतर त्याचे माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षण कानगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व आदर्श विद्यालयात झाले.

त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून त्याने अभियंत्रिकेची पदवी घेतली. दरम्यान, त्याने 2021 मध्ये एमपीएससी परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये गणेशने राज्यातून तब्बल 66 क्रमांक मिळवला असून, तो मुख्याधिकारी होणार आहे. वयाच्या 28 व्या वर्षी गणेश मुख्याधिकारी बनला असल्याने पंचक्रोशीतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

माझे वडील संपतराव चौधरी व आई परिघा चौधरी यांनी गरीब परिस्थिती असताना संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली व मला अभ्यास करण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले. मला कुठल्याही दुःखाची झळ माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही. त्यामुळे हे यश मी संपादन करू शकलो.

    -गणेश चौधरी

Back to top button