पुणे : रांजणे-पाबे घाटरस्त्याचे काम युद्धपातळीवर | पुढारी

पुणे : रांजणे-पाबे घाटरस्त्याचे काम युद्धपातळीवर

दत्तात्रय नलावडे : 

वेल्हे : सिंहगड, तोरणा व राजगडला जवळच्या अंतराने जोडणार्‍या रांजणे-पाबे घाटरस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन महिन्यांत मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर फाटा ते रांजणे-पाबे घाटरस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातून अवघ्या एक ते सव्वा तासात वेल्हे, राजगड व तोरणागडाच्या पायथ्याला पोहोचता येणार आहे. त्यामुळे हवेली तसेच वेल्हे तालुक्यातील डोंगराळ व खेड्या-पाड्यातील पर्यटनासह रोजगाराला चालना मिळणार आहे. पुण्यातून कात्रज, नसरापूरमार्गे तोरणा किल्ला व राजगडाच्या पायथ्याला जाण्यासाठी जवळपास 60 किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागतो.

तसेच महामार्गावर वाहनांना टोलही द्यावा लागतो. त्याऐवजी खानापूर, रांजणे-पाबे घाटामार्गे पुणे ते राजगड व तोरणा किल्ला पायथ्याचे अंतर जेमतेम 48 किलोमीटर इतके आहे. तसेच या मार्गावर कोणताही टोल नाही. याशिवाय इंधन, वेळ व पैशांची बचत होत असल्याने या मार्गाने पर्यटकांची वर्दळ असते. तसेच स्थानिक नागरिकांचीही दूध, शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी वर्दळ याच घाटाने असते. तीव्र चढ व उतार असल्याने एसटी, पीएमपीएमएल बस अशी सार्वजनिक वाहतूक या मार्गाने होत नाही. केवळ घाटाच्या पायथ्याला असलेल्या रांजणे गावापर्यंत पीएमपीएमएलची बससेवा सुरू आहे.

त्यामुळे स्थानिकांना वाहतुकीची मोठी समस्या आहे. मात्र, आता रांजणे-पाबे घाटरस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. प्रथमच सिंहगड, पानशेत व किल्ले तोरणा परिसर जवळच्या अंतराने जोडणार्‍या रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर झाला आहे. 202 कोटी रुपये खर्चाच्या या रस्ते प्रकल्पाचे काम 5 वर्षांपूर्वी खडकवासला येथे सुरू करण्यात आले आहे.

वनखाते व इतर अडचणींमुळे कामाची मुदत संपूनही अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी रस्त्याचे काम रखडले होते. आता या कामाला गती मिळाली आहे. खानापूर ते रांजणे-पाबे घाटरस्त्याचे अंतर 18 किलोमीटर इतके आहे. उंच डोंगररांगांच्या कडेकपारीतून घाटरस्ता आहे. या भागात जोरदार अतिवृष्टी असते. त्यामुळे खानापूर ते पाबेपर्यंत डोंगरकडे, ओढे-नाल्यांच्या पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारे, संरक्षक भिंत अशी कामे सुरू आहेत. येत्या दोन महिन्यांत घाटरस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यात येणार आहे.

रांजणे-पाबे घाटरस्त्यावर तीव्र चढ व उतार असल्याने ते कमी करण्याचे काम सुरू आहे. वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी यासाठी संरक्षण कठडे बांधून रस्त्याचे मजबुतीकरण केले जात आहे. खानापूर-थोपटेवाडी रस्त्याचे रखडलेले कामही वेगाने सुरू आहे. दोन्ही ठिकाणची कामे येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहेत.
                 – ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Back to top button