वडगाव मावळ : प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन | पुढारी

वडगाव मावळ : प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

वडगाव मावळ : प्रशासन आमची दखल घेत नाही, आता तुम्हीच आम्हाला न्याय द्या, असे साकडे मावळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे घातले. दरम्यान, मावळ तालुका अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आमदार शेळके यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी 20 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकाही सहभागी झाल्या आहेत. आपल्या मागण्या शासनापर्यंत पोचाव्यात यासाठी अंगणवाडी सेविकांनी आमदार सुनील शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर आंदोलन करीत आमदार शेळके यांना निवेदन दिले.

शासनाच्याच सेवक असल्याने शासकीय कर्मचारी दर्जा, शासकीय वेतन श्रेणी व अन्य सर्व लाभ लागू करावे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार ग्रॅच्युइटी देणे. सेवा समाप्ती लाभ रक्कम सेवा समाप्त झालेल्या सेविका रुपये एक लाख व मदतनीस रुपये पंचाहत्तर हजार गेल्या चार वर्षांपासून मिळाले नसल्याने तो त्वरित देऊ करावा. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मासिक पेन्शन लागू करावी. कुपोषित बालकांसाठी तीन पट तर सामान्य मुलांसाठी दुप्पट आहार रकमेत तातडीने वाढ करावी इत्यादी मागण्या केल्या आहेत.

मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला भाग पाडू
आमदार सुनील शेळके या वेळी म्हणाले, की अंगणवाडी सेविकांच्या मागण्या 27 फेब—ुवारीपासून सुरू होणार्‍या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडू, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करू देऊ, एव्हढेच नव्हे, तर त्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला भाग पाडू, असे
आश्वासन दिले.

आझाद मैदानावर राज्यभरातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन सरकारचे लक्ष वेधणार आहोत. कुपोषित बालकांसाठी तीन पट तर सामान्य मुलांसाठी दुप्पट आहार रकमेत तातडीने वाढ करावी इत्यादी मागण्या केल्या आहेत.

                  – अनिता कुटे, अध्यक्ष, मावळ तालुका अंगणवाडी कर्मचारी संघ

Back to top button