पुणे : पीयूसी कारवाई तीव्र होणार; आरटीओचे आदेश | पुढारी

पुणे : पीयूसी कारवाई तीव्र होणार; आरटीओचे आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाहनचालक पीयूसी काढण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यासंदर्भात दै. ‘पुढारी’मध्ये मंगळवारी (दि.21) वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन पुणे आरटीओ अधिकार्‍यांनी पीयूसीची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहरात वाहनांची संख्या 44 लाखांपेक्षा अधिक आहे. त्यापैकी फक्त 9 लाख वाहनचालकांनीच पीयूसी काढली आहे.

त्यामुळे शहरात प्रदूषण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात माहिती देणारे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर परिवहन विभागातील यंत्रणा जागी झाली असून, तातडीने पीयूसीची कारवाई तीव्र करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी सर्व वायुवेग पथकांना दिले आहेत.

या नियमानुसार होणार दंड
मोटार वाहन कायद्यातील कलम 115/190 आणि 116/190 नुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पुणे
शहरासह पुणे विभागात ही धडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी तत्काळ वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे आवाहन आरटीओने केले आहे.

पीयूसी नसल्यास इतका दंड
दुचाकी – 2 हजार रुपये
तीनचाकी – 2 हजार रुपये
चारचाकी – 4 हजार रुपये

पीयूसीचे दर
चारचाकी पेट्रोल – 125 रु.
चारचाकी डिझेल – 150 रु.
दुचाकी – 50 रु.
पुण्यातील पीयूसी केंद्रे – 288

पुणेकरांनी पीयूसीकडे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पाहत वेळोवेळी पीयूसी काढणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील अनेक वाहनचालकांकडून पीयूसी काढली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आम्ही सर्व वायुवेग पथकांना पीयूसीसंदर्भातील कारवाई तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत.

                        डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Back to top button