पुणे : ’ड्रीम प्रोजेक्ट’ला दिरंगाई; मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी कर्ज घेण्याचा घाट | पुढारी

पुणे : ’ड्रीम प्रोजेक्ट’ला दिरंगाई; मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी कर्ज घेण्याचा घाट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी नायडू रुग्णालयाच्या परिसरात स्वतंत्र रुग्णालय प्रस्तावित आहे. हे रुग्णालय उभारण्यावर भर न देता, महापालिकेने वारजेतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा घाट घातला आहे. महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी 130 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर, वारजेतील रुग्णालयासाठी महापालिकेच्या नावे 360 कोटी रुपयांचे कर्ज काढले जाणार आहे.

महाविद्यालयासाठी आवश्यक असणा-या रुग्णालयाचे काम अजूनही सुरू करण्यात आलेले नाही. जुनी कोठी असलेल्या जागी वसतिगृहाची इमारत प्रस्तावित आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रस्ताव तयार केलेला असूनही, काम धीम्यागतीने सुरू आहे महाविद्यालयाची नवीन इमारत पाच मजली आणि रुग्णालयाची इमारत सहा मजली असणार असून, त्यासाठी 130 कोटी रुपये इतकी तरतूद लागणार आहे. वसतिगृह इमारत आठ मजली असणार असून, पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात 80 कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे.

दुस-या वर्षाच्या अभ्यासक्रमात अडथळा
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाच्या लेखी परीक्षा झाल्या असून, सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. मार्चमध्ये दुस-या वर्षाचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, नायडू रुग्णालयाच्या इमारतीतील वर्गखोल्या आणि प्रयोगशाळांचे काम पूर्ण न झाल्याने अभ्यासक्रम सुरू करण्यास दिरंगाई होणार आहे. मार्च महिन्यात दुस-या वर्षाचे वर्ग सुरू होणार असताना प्रयोगशाळांचे, वर्गखोल्यांचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. दुस-या वर्षासाठी एनएमसीची अंशत: परवानगी मिळाली आहे. इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर नॅशनन मेडिकल कमिटीची व्हिजिट झाल्यावरच पूर्ण परवानगी मिळणार आहे. प्रयोगशाळांसाठी लागणारी साधनसामग्री अद्याप आलेली नाही. अजून वर्कऑर्डरची प्रक्रियाच सुरू आहे.

प्राध्यापकांची भरती
महाविद्यालयामध्ये किमान 150 प्राध्यापक आणि इतर कर्मचारी असणे आवश्यक आहे. सध्या 100 ते 105 एवढेच मनुष्यबळ उपलब्ध आहे. इतर जागा रिक्त असून, अजूनही ‘वॉक इन’ सुरू आहेत. प्राध्यापकांना वेतन समाधानकारक नसल्याने चांगली संधी मिळाल्यावर प्राध्यापक सोडून जाण्याचे प्रमाणही दिसत आहे.

दुस-या वर्षाचे वर्ग मार्च महिन्यात सुरू होतील. वर्गखोल्या आणि प्रयोगशाळांचे काम अंतिम टप्प्यात आहे. कमला नेहरू हॉस्पिटलमधील विभाग आणि सुविधा विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अपु-या पडत आहेत. त्यामुळे केईएम हॉस्पिटलशीही चर्चा झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सरावाच्या दृष्टीने केईएमशी सामंजस्य करार होणार आहे.

                                                      – डॉ. आशिष बंगिनवार,
                                               अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय

Back to top button