पुणे : भाजपकडून दहशत पसरवण्याचे काम ; नाना पटोले यांचा आरोप | पुढारी

पुणे : भाजपकडून दहशत पसरवण्याचे काम ; नाना पटोले यांचा आरोप

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात येत आहे. भाजपकडून दहशत निर्माण केली जात आहे. या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भानुदास माली, अमित मेश्राम आदी उपस्थित होते.

पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पक्षाकडून मतदारसंघात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. भाजपचे खासदार, मंत्री, आमदार गाड्यांमधून फिरत आहेत. त्यांच्याबरोबर गुंड प्रवृत्तीचे काही जण आहेत. ते कार्यकर्त्यांना दमदाटी करीत आहेत. मतदारांना प्रलोभने आणि आमिषे दाखविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

पैसे वाटल्याच्या तक्रारी
दत्तवाडी, गंज पेठ, लोहियानगर परिसरात पैसे वाटप करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. पोलिसांच्या नावाने कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे, असे पटोले यांनी निवेदनात म्हटले आहे. पोलिसांच्या नावे दूरध्वनी करणार्‍यांचा शोध घ्यायला हवा. पोलीस यंत्रणेचा वापर भारतीय जनता पक्ष करीत आहे. पोलीस आयुक्तांनी आचारसंहितेचा भंग होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

Back to top button