जुन्नरच्या पर्यटनासाठी 2 वर्षांत 100 कोटी; पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती | पुढारी

जुन्नरच्या पर्यटनासाठी 2 वर्षांत 100 कोटी; पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर पर्यटन विकासासाठी पुढील 2 वर्षांत 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, या वर्षीच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवासारखे आयोजन यापुढे शिवजयंतीनिमित्त दरवर्षी करण्यात येईल, असे राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जाहीर केले. शिवजयंतीनिमित्त राज्य शासनाच्या वतीने हिंदवी स्वराज्य महोत्सवांतर्गत जुन्नर येथील बुट्टे-पाटील मैदानात भव्य महाशिव आरतीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी लोढा बोलत होते.

आमदार प्रवीण दरेकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा नियोजन समिती सदस्या आशा बुचके आदी या वेळी उपस्थित होते.

लोढा म्हणाले की, जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी शिवकालीन गाव उभे करण्यात येईल. पर्यटन विभागाकडून येथे कायमस्वरूपी टेन्ट सिटी उभी करण्यात येईल. तसेच एका शिवकालीन म्युझियमचीही उभारणी करण्यात येणार आहे, असेही लोढा यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, हातात दिवे, पणती घेऊन शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने महाशिव आरती, शिववंदना करण्यात आली. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या महाशिव आरतीसाठी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. या वेळी मछत्रपती शिवाजी महाराज की जयफ, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषांनी सारा परिसर दणाणून गेलेला होता.

Back to top button