Shikrapur accident : शिक्रापूर-चाकण येथे कंटेनरच्या धडकेत आई- वडिलांसह चिमुकली ठार | पुढारी

Shikrapur accident : शिक्रापूर-चाकण येथे कंटेनरच्या धडकेत आई- वडिलांसह चिमुकली ठार

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: Shikrapur accident : शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील जातेगाव फाटा येथे कंटेनरची दुचाकीला धडक बसून आई-वडिलांसह सात महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.

Shikrapur accident  या अपघातात अशोक दगडू पवार, सारिका अशोक पवार व अनु अशोक पवार (वय ७ महिने, सर्व रा. जातेगाव बुद्रुक, मुळ रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगोला) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत शुभ्रा अशोक पवार (वय तीन वर्ष) ही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि. ३०) रोजी सायंकाळच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रस्त्याने चाकणहून अशोक पवार, त्याची पत्नी सारिका हे दोन मुलींसह दुचाकी (एमएच १६ झेड ३६०६)ने चालले होते. याच दरम्यान जातेगाव फाटा येथील न्यू पंजाबी ढाबा हॉटेलसमोर रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून ते फोनवर बोलत होते.

यावेळी पाठीमागून आलेल्या कंटेनरने (टीएस ०७ यूएफ ९५५५) त्यांच्या उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी पवार कुंटूंब आणि दुचाकी कंटेनरच्या खाली चिरडले गेले.

दरम्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घेवून जखमींना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान अशोक, सारिका आणि अनु या तिघांचा मृत्यू झाला.

शिक्रापूर पोलिसांनी कंटेनर चालक बालाजी संजय येलगटे (वय २४, रा. अंजनगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक शिवदास खाडे हे करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button