पुणे : कसब्यातील प्रश्नांसाठी नरेंद्र मोदी येणार नाहीत : खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण यांची टीका | पुढारी

पुणे : कसब्यातील प्रश्नांसाठी नरेंद्र मोदी येणार नाहीत : खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण यांची टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणेकरांचे प्रश्न सोडवायला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार नाहीत, हे सुज्ञ पुणेकर जाणून आहेत. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभव दिसू लागल्याने स्थानिक प्रश्नांवर बोलण्यापेक्षा भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने प्रचार करून मते मागत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी केली.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी त्या बोलत होत्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी या वेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाल्या, ’नदीकाठ सुधार प्रकल्प हा कसब्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रकल्पाच्या नावाखाली अत्यंत घातक पद्धतीने काम सुरू आहे. पंतप्रधान मोदींचे पूर्वीइतके वलय आता राहिलेले नाही. त्यांचा महत्त्वाकांक्षी साबरमती नदीकाठ सुधार प्रकल्प अयशस्वी ठरला असताना, त्याच धर्तीवर पुणे महापालिका नदीकाठ सुधार प्रकल्प राबविणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर चर्चा होणे महत्त्वाचे आहे. स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत या योजना फसव्या ठरल्या. भाजपचे उमेदवार हेमंत रासने चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते. चार वर्षे संधी मिळूनही त्यांना एकही ठोस प्रकल्प राबविता आला नाही. त्यांनी जी कामे केली, त्याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याउलट धंगेकर हे सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे, त्यांची कामे करणारे लोकप्रतिनिधी आहेत.’

Back to top button