पुणे : बाजारात केळीची उच्चांकी उसळी | पुढारी

पुणे : बाजारात केळीची उच्चांकी उसळी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्यांचे हक्काचे फळ समजले जाणारे केळही आत्ता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. कोरोनाकाळात मागणी अभावी लागवडीत मोठी घट झाल्याचा परिणाम केळीच्या उत्पादनावर झाला आहे. सध्यस्थितीत बाजारात केळीची आवक कमी प्रमाणात होत आहे. दरम्यान, दर्जेदार केळींच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील काही महिन्यांपासून केळीचे दर 60 रुपयांपर्यंत होते. मात्र, महाशिवरात्रीमुळे मागणी वाढल्याने शुक्रवारी (दि. 17) बाजारात केळीचे प्रतिडझनाचे दर 80 रुपयांपर्यंत पोहोचले.

गरीबांसह श्रीमंतांपर्यंत सर्वाच्या फलाहारामध्ये हमखास असणारे फळ म्हणजे केळी. लॉकडाऊनपुर्वी लागवडी चांगल्या झाल्याने केळीच्या उत्पादनही चांगले झाले होते. मात्र, लॉकडाऊन काळात बाजारपेठांच्या चालू-बंद परिस्थितीमुळे केळींना अपेक्षेएवढी मागणी राहिली नाही. परिणामी, मार्केट यार्डातील घाऊक बाजारात याकाळात केळीच्या किलोला तीन ते सहा रुपये दर मिळाला.

कोरोना व लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती कधीपर्यंत राहिल याची शाश्वती नसल्याने शेतकर्यांनी नवीन लागवडी केल्या नाही. त्यानंतर मात्र बाजारपेठा सुरळीत सुरू होऊन केळीला मागणी वाढू लागली. मात्र, मागणीच्या तुलेत उत्पादन कमीच राहिले. याखेरीज, दर्जेदार
केळींच्या निर्यातीतही वाढ होऊ लागली. याखेरीज, महाशिवरात्रीमुळे मागील चार दिवसांत मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, घाऊक बाजारात केळींच्या किलोचे भाव 15 ते 20 रुपयांपर्यंत पोहोचले. एरवी हेच दर सरासरी 8 ते 12 रुपयांपर्यंत असतात. घाऊक बाजारात दरवाढ झाल्याने किरकोळ बाजारातही केळींच्या दरात वाढ होऊन त्याचे भाव 40 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले.

  • बाजारात केळीच्या डझनास 80 रुपयांपर्यंत भाव
  • महाशिवरात्रीमुळे केळीच्या मागणीत मोठी वाढ
  • उत्पादनात घट व निर्यातीत वाढ झाल्याचा परिणाम
  • किरकोळ बाजारात डझनामागे वीस रुपयांची वाढ

केळी – गावरान केळी, सोनकेळी
आवक – 10 ते 12 पिकअप वाहन (दररोज)
कोठून – पुणे, सोलापूर, अकलूज, इंदापूर, फलटण
घाऊक दर – 15 ते 20 रुपये (प्रतिकिलो)
किरकोळ दर – 40 ते 80 रुपये (प्रतिडझन)

लॉकडाऊन काळात फक्त दर्जेदार केळीला मागणी राहिली कारण त्यांचे दरही कमी होते. त्यामुळे, शेतकर्यांनी लागवड कमी केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात महाशिवरात्रीमुळे केळींना मागणी वाढल्याने केळींचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. केळीला हे दर मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

                                                   – अनिकेत वायकर, केळी व्यापारी

Back to top button