पुणे : स्मार्ट प्रकल्पालाच गालबोट; अधिकार्‍यांची बैठकीत खडाजंगी | पुढारी

पुणे : स्मार्ट प्रकल्पालाच गालबोट; अधिकार्‍यांची बैठकीत खडाजंगी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे (स्मार्ट) संचालक कौस्तुभ दिवेगावकर आणि कृषी आयुक्तालयातील कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) संचालक दशरथ तांभाळे यांच्यामध्ये प्रशिक्षणासाठी संस्था नेमणुकीवरून जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे अधिकार्‍यांच्या वादामुळे हे प्रकरण कृषी विभागात जोरदार चर्चिले जात असून, शेतकर्‍यांसाठीच्या या स्मार्ट प्रकल्पाच्या नावालाच गालबोट लागल्याने टीका होत आहे.

जागतिक बँक आणि राज्य सरकारच्या निधीतून संयुक्तरीत्या स्मार्ट प्रकल्प राबविण्यात येत आहे. कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी स्मार्ट प्रकल्पाबाबत 10 फेब्रुवारीला बोलावलेल्या ऑनलाइन बैठकीमध्येच वादाचे पडसाद उमटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे ’स्मार्ट’मध्ये सर्वकाही आलबेल नसून, हा प्रकल्प पुढे नेण्याचेच आव्हान कृषी सचिवांसमोर उभे राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, कृषी सेवा वर्ग – 1 अधिकारी कल्याणकारी संघटनेने तांभाळे यांना दिलेल्या वागणुकीचा कृषी सचिवांकडे निषेध नोंदविला आहे. तसेच शुक्रवारी (दि.17) कृषी विभागातील सर्व अधिकार्‍यांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच याप्रश्नी कार्यवाही न झाल्यास अधिकार्‍यांना सामूहिकरीत्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, याबाबत तांभाळे यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल आपली बाजू कृषी सचिवांकडे लेखी दिल्याचे सांगितले. पत्रात म्हटले आहे की, सोलापूर येथे तृणधान्याचे उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्याचे सूतोवाच राज्यपालांनी 26 जानेवारीच्या भाषणात केले होते.

तसेच कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली 30 जानेवारी रोजी झालेल्या स्मार्ट नियामक मंडळाच्या बैठकीत सोलापूर येथे हैद्राबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेटस रिसर्च (आयआयएमआर) संस्थेच्या मदतीने ’मिलेटस्’चे उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंत्रालयात 31 जानेवारीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र मिलेट अभियान उद्घाटनात तशी घोषणा केली होती.

मात्र, स्मार्ट नियामक मंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तात नोंद नसल्याचे मत तांभाळे यांनी बैठकीत मांडले आणि त्यावरून दोन्ही अधिकार्‍यांमध्ये वाद झाला. यादरम्यान सचिवांना आलेल्या दूरध्वनीमुळे माईक आणि व्हिडिओ थोडा वेळ म्युट असताना दिवेगावकर यांनी असंसदीय भाषा वापरून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार तांभाळे यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली असून, कारवाईची मागणी केली आहे.

तांभाळे यांनी स्मार्टमध्ये आयआयएमआर संस्थेबरोबरच्या कराराचा सुमारे 6 कोटी 40 लाख रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता. संगणक, फर्निचर, कंत्राटी कर्मचार्‍यांसाठी हा खर्च दाखविण्यात आला होता. कृषी विद्यापीठात तृणधान्य संशोधन केंद्रातच 30 लाखांतच प्रशिक्षण शक्य आहे. त्यामुळे जादा खर्चाची माहितीच आमच्यासमोर न आल्याने बैठकीत उपस्थित पाच ते सहा अधिकार्‍यांसमोरच मी याबाबत विचारणा करण्यात काहीही वावगे नाही. मी तांभाळे यांना चुकीच्या पध्दतीने वागणूक दिलेली नाही. याबाबतचा अहवाल मी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना दिला आहे.

            – कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प संचालक, स्मार्ट प्रकल्प, पुणे.

Back to top button