पुणे : शहरभर प्रेमाचा रंग! गुलाब अन् चॉकलेट देऊन केले प्रपोज | पुढारी

पुणे : शहरभर प्रेमाचा रंग! गुलाब अन् चॉकलेट देऊन केले प्रपोज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे…. मंगळवारी (दि.14) हा प्रेमाचा दिवस तरुणाईने जल्लोषात साजरा केला…कोणी कँडल लाइट डिनरला जाण्याचे निमित्त साधले, तर कोणी गुलाबपुष्प अन् चॉकलेट देऊन प्रेयसी-प्रियकराला प्रपोज केले… प्रेमोत्सवाचा हाच रंग शहरात विविध ठिकाणी पाहायला मिळाला. ठिकठिकाणचे रेस्टॉरंट अन् कॅफेजमध्ये ’व्हॅलेंटाईन डे’चा फिव्हर दिसून आला.

फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसर, कॅम्प, कोरेगाव पार्क आदी ठिकाणी हातात गुलाबी रंगाचे फुगे अन् गुलाब पुष्प घेतलेली तरुणाई जल्लोष करताना दिसली. महाविद्यालयाच्या कट्ट्यावर अन् मॉलमध्येही प्रेमरंग बहरला होता. काहींनी शॉपिंग करत, रेस्टॉरंटमध्ये जेवण करत अन् प्रेमाचा हा दिवस खास बनवला.

या दिवशी अनेकांनी लाँग ड्रॉव्हईला जाण्याचे निमित्त साधले, तर कोणी एकमेकांना लग्नासाठी विचारणा केली, तर काहींनी लोणावळा, मुळशी, पानशेत, पाचगणी, महाबळेश्वर आदी ठिकाणी फिरायला जाण्याला प्राधान्य दिले. ज्येष्ठ नागरिकांनीही आपल्या जोडीदाराकडे प्रेम व्यक्त केले. सायंकाळी ठिकठिकाणी आयोजिलेल्या म्युझिक कॉन्सर्टला तरुणाईने उपस्थिती लावली.

रेस्टॉरंट, आइस्क्रीम पार्लरीमध्ये गर्दी
फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, कॅम्प, कोरेगाव पार्क , बाणेर अशा विविध ठिकाणी ’व्हॅलेंटाईन डे’ फिव्हर रंगला होता. सायंकाळनंतर गुलाबी रंगाची फुगे…गुलाब पुष्प हाती घेतलेली तरुणाई अन् लाल-गुलाबी रंगाचे कपडे परिधान केलेल्या तरुणाईने फुलले होते. येथील रेस्टॉरंट, आइस्क्रीम पार्लर आणि कॅफेमध्येही या निमित्ताने गर्दी पाहायला मिळाली. येथे खास विद्युत रोषणाईही आणि थीमनुसार सजावट केली होती.

सतरा लाखांवर डच गुलाबांची विक्री

प्रेमीयुगुलांचा उत्सव असलेल्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलटेकडी मार्केट यार्डातील फूलबाजारात तब्बल 17 लाखांहून अधिक डच गुलाबांची विक्री झाली. या काळात बाजारात 20 फुलांच्या 87 हजार 328 गड्ड्यांची आवक झाली. त्यास 100 ते 300 रुपये दर मिळाल्याची माहिती फूलबाजार विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी दिली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत दहा दिवसांत तब्बल 1 कोटी 74 लाख रुपयांची उलाढाल झाली.

रोझ डे व व्हॅलेंटाईन डेच्या दोन दिवस आधी लाल डच गुलाबांना चांगली मागणी राहिली. या दिवशी किरकोळ बाजारात 30 ते 40 रुपये प्रतिनग असी विक्री सुरू होती. पुण्यातील बाजारपेठेतून राज्यभरातील विविध बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी फुले पाठविण्यात आली,असे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

Back to top button