बेल्हेनगरीत प्रथमच दोन दिवस बैलगाडा शर्यती | पुढारी

बेल्हेनगरीत प्रथमच दोन दिवस बैलगाडा शर्यती

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : बेल्हे येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींसाठी अवघ्या तासाभरात 400 हून अधिक बैलगाडामालकांनी टोकण नोंदणी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात टोकण बुक होणारी बेल्हेनगरीच्या इतिहासातील पहिली बैलगाडा शर्यत आहे. बैलगाडा शर्यतीचा घाट अद्ययावत केल्यानंतर हा ’रेकॉर्ड ब्रेक’ उत्सव होणार असून, शेतकरी आणि बैलगाडामालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती बैलगाडा शर्यतीचे आयोजक जानकू डावखर, धोंडीभाऊ पिंगट यांनी दिली.

बेल्हे गंगाद्वार येथील ओढ्याच्या पात्रात असलेल्या घाटाचे काम आमदार अतुल बेनके व ग्रामस्थांच्या पुढाकाराने झाल्यानंतर परिसरात सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. दि. 15 ते 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत ही अत्यंत नियोजनबद्ध शर्यत होणार आहे.

बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी टोकन बंधनकारक केले होते. बाजारतळावरील मैदानात सोमवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत टोकण स्वीकारण्यात आले.या वेळी बैलगाडामालकांनी मोठी गर्दी केली. या टोकणचा ’लकी ड्रॉ’ काढून शर्यतीचे नियोजन करण्यात येणार आहे. एका बॉक्समध्ये 2 हजार नावांच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात.

त्याद्वारे पहिली चिठ्ठी मिळालेला बैलगाडा पहिल्यांदा धावणार, असे नियोजन केले जाते. टोकणची रक्कम घाटात गाडा जुंपल्यावर परत दिली जाते, असे राहुल सस्ते यांनी सांगितले. घाट एकूण 12 सेकंदांचा आहे. त्याआधारे डिजिटल घड्याळाच्या आधारे किती सेकंदांत बैलगाडा शर्यत पूर्ण करतो, याची नोंद केली जाते. सुमारे 400 बैलगाड्या या घाटात धावणार आहेत. यंदा बैलगाडा शर्यतीला प्रतिसाद असून, लक्षवेधी बक्षिसांची मेजवानी असल्यामुळे शर्यतीला परिसरातून प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, बैलगाडा घाटाचा तळ व निशाणाजवळील भाग पूर्णपणे रिकामा ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असून, बैलगाडा शर्यतीसाठी गर्दी होणार असल्याने बैलगाडा घाटाचा पूर्ण ताबा सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिस प्रशासनाकडे देण्यात आला आहे. बैलगाडा पार्किंग व्यवस्था स्वतंत्रपणे केली आहे. दुचाकी आणि चारचाकी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली आहे, असेही संयोजकांनी सांगितले.

Back to top button