पुणे : 2024 च्या लढाईचा प्रारंभ ; सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन | पुढारी

पुणे : 2024 च्या लढाईचा प्रारंभ ; सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक ही 2024 मधील निवडणुकीच्या लढाईचा प्रारंभ आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  केले. कसबा पेठ निवडणुकीत भाता पक्ष महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराला ओंकारेश्वर मंदिर येथून पदयात्रेची सुरुवात झाली. त्यावेळी मुनगंटीवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उमेदवार हेमंत रासने यांच्यासह पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यावरून राज्य दहशतीखाली असल्याची टीका विरोधक करत आहेत. त्यावर मुनगंटीवार म्हणाले, त्यांचं बरोबर आहे, ते केवळ वर्ष बदलत आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना विरोधात बातमी दिली म्हणून पत्रकाराला अटक झाली. विरोधात बोलणार्‍या माजी अधिकार्‍याला मारहाण केली गेली. खासदार नवनीत राणा यांना तुरुंगात टाकण्यात आले, असे मुनगंटीवार म्हणाले.

1978 सालापासून एखाद-दुसरा अपवाद वगळला तर कसबा मतदारसंघातील मतदारांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे. सत्य, धर्म, देश, विकासासाठी काम करणार्‍या विचारांचा विजय झाला आहे. विरोधी उमेदवाराने वारंवार पक्ष बदलला आहे, त्याची लढाई खुर्चीसाठी, सत्तेसाठी आहे. हेमंत रासने यांचा लढा सत्य आणि विकासासाठी आहे. केंद्र आणि राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरकार आहे.

पद यात्रेत दिवंगत आमदार मुक्ता टिळकांचे चिरंजीव कुणाल आणि पती शैलेश टिळक यांच्या उपस्थितीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. उमेदवारी न दिल्याने टिळक कुटुंब नाराज असल्याच्या चर्चा होत्या. कुणाल टिळक म्हणाले, आम्हाला उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या सोशल मीडियावर आणि सगळीकडे चर्चा रंगल्या होत्या. मात्र, ब्राह्मण समाज नाराज आहे की, नाही हे येत्या 2 मार्चला
कसब्याच्या निकालाच्या दिवशी सर्वांसमोर येईल. मात्र, आम्ही नाराज नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Back to top button