पुणे : मोफत सूप वाटतो म्हणून हॉटेलचालकावर हल्ला | पुढारी

पुणे : मोफत सूप वाटतो म्हणून हॉटेलचालकावर हल्ला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील एका हॉटेलचालकाने आपल्या हॉटेलमधील ग्राहकांची संख्या वाढावी याकरिता ’मोफत सूप’ देण्याची योजना राबविली. त्यास ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. परंतु, यामुळे आपल्या ग्राहकांची संख्या कमी झाली या रागातून दुसर्‍या हॉटेल चालकाने त्याला मारहाण करत जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिद्धार्थ भालेराव व दिग्विजय गजरे (रा. खडकी, पुणे) यांच्यावर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुलायम रामकृपाल पाल (वय 27, रा. खडकी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सहा फेब्रुवारी रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलायम पाल यांचे संबंधित ठिकाणी हॉटेल आहे. तर त्यांच्या हॉटेलजवळच दुसरे एक हॉटेल आहे. तक्रारदार यांनी त्यांची ‘मोफत सूप’ देण्याची योजना नुकतीच सुरू केली होती.

त्यामुळे दुसर्‍या हॉटेलचे ग्राहक कमी झाले. याचा राग मनात धरून आरोपी सिध्दार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे यांनी तक्रारदार मुलायम पाल यांच्या डोक्यात लोखंडी धारदार हत्याराने मारून जखमी करून ‘येथे धंदा का करता’ म्हणून शिवीगाळ केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, खडकी पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले.

Back to top button