पिंपरी : मालमत्तेला लिंक केलेले मोबाईल क्रमांक चुकीचे | पुढारी

पिंपरी : मालमत्तेला लिंक केलेले मोबाईल क्रमांक चुकीचे

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मालमत्ताधारकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक हा मालमत्ता क्रमांकाशी संलग्न (लिंक) केला आहे. मात्र, असंख्य नागरिकांनी चुकीचे व बंद मोबाईल क्रमांक लिंक केल्याने संबंधित विभागाची गैरसोय होत आहे. त्यावरून वाद निर्माण होत आहेत. अद्ययावत मोबाईल क्रमांक देण्याचे आवाहन महापालिकेच्या करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.3) केले आहे.

मालमत्ताधारकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर मालमत्ता कर भरण्याबाबत वारंवार सूचना देण्यात येत आहेत. तसेच वारंवार आवाहन करूनही जे मालमत्ताधारक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करतात, अशा मालमत्तांचे नळजोड तोडणे, मालमत्ता जप्ती करणे आदी कारवाई केली जात आहे. असंख्य मालमत्ताधारकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक मालमत्तेला लिंक न केल्यामुळे त्यांना करसंकलन विभागाकडून पाठवण्यात येणारे एसएमएस प्राप्त होत नाहीत. काहींनी मालमत्तेला चुकीचा मोबाईल क्रमांक लिंक केले आहेत. त्यामुळे संबंधितांना त्यांच्या मालमत्तेबाबत माहिती मिळत नाही.

मोबाईल क्रमांक नंबर लिंक न केलेल्या, चुकीचा मोबाईल क्रमांक अपडेट न केलेल्या मालमत्ताधारकांकडे कर थकबाकी असल्यास जेव्हा कारवाई करण्यासाठी करसंकलन विभागाचे पथक जाते, तेव्हा मालमत्ताधारकांकडून मोबाईलवर एसएमएस न आल्याची तक्रार केली जाते. अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवतात. कर थकबाकी असल्यामुळे कारवाई केली जात आहे.

मालमत्तेला योग्य मोबाईल क्रमांक लिंक असल्यास मालमत्ताधारकांना पाठवण्यात येणारी माहिती वेळेवर मिळेल व वरील प्रसंग उद्भवणार नाही. मोबाईल क्रमांक स्वतःच्या मालमत्तेला लिंक करण्यासाठी किंवा मोबाईल क्रमांक अपडेट पालिकेच्याwww. pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन करता येते. किंवा विभागीय कार्यालयाकडे अर्ज करावा.

मोबाईल नंबर अपडेट का करावा?
मालमत्तेला मोबाईल क्रमांक लिंक असल्यामुळे संबंधित मालमत्तेच्या माहितीचा तपशील मिळतो. जर एखाद्या मालमत्ताधारकाने त्याच्या मालमत्तेला चुकीचा मोबाईल क्रमांक लिंक केला असेल, तर तो क्रमांक वापरत असलेल्या व्यक्तीला संबंधित मालमत्तेची माहिती मिळू शकते. असे प्रकार घडल्याबाबतच्या तक्रारीही करसंकलन विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळेच मालमत्ताधारकांनी स्वतःच्या मालमत्तेला तो वापरत असलेला मोबाईल क्रमांक लिंक करणे गरजेचे आहे. मालमत्तेला लिंक केलेला क्रमांक हा संबंधित मालमत्ताधारक वापरत नसेल, तर तात्काळ त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करून घेणे आवश्यक आहे.

ऑनलाइन सुविधेसाठी मोबाईल क्रमांक आवश्यक
घरबसल्या मिळकतकर भरण्यासह नागरिकांना करसंकलन विभागाच्या सर्व सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मालमत्तेला मोबाईल क्रमांक लिंक करून व चुकीचा मोबाईल नंबर लिंक केला असल्यास तो नव्याने अपडेट करून या सुविधांचा लाभ घ्यावा. शासनाच्या नवीन डिजिटल सुरक्षा धोरणामध्ये वैयक्तिक डाटा खासगी सुरक्षा विचारात घेण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे या सुविधांचा लाभ घेताना मोबाईल क्रमांक व त्यावर येणारा ओटीपी सक्तीचा केलेला आहे. विनाअडथळा सुविधा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल अपडेट करून घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

Back to top button