जांभोरी येथे बिबट्याचा धुमाकूळ; शेळीसह शेतकर्‍यावर हल्ला | पुढारी

जांभोरी येथे बिबट्याचा धुमाकूळ; शेळीसह शेतकर्‍यावर हल्ला

भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा : आदिवासी भागातील जांभोरी येथील लोहारवाडी सतारमाची, लिंबोनीची वाडी परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत. सायंकाळी 7 नंतर लोक घराबाहेर पडत नाहीत. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. पश्चिम भागातील जांभोरी गावाच्या वाड्या-वस्त्यांमध्ये गेली पाच-सहा दिवस बिबट्याचा वावर आढळत असून, गुरुवारी (दि. 26) शेतातून घरी जाणार्‍या गोंविद तिटकारे यांच्यावर या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सुदैवाने ते यातून बचावले. शुक्रवारी (दि. 27) बारकु दुलबा केंगले (लोहारवाडी) यांच्या शेळीवर संध्याकाळी पाच वाजता बिबट्याने हल्ला केला. कुशाबा तिटकारे यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्यांनी हातातील दांडक्याने बिबट्यावर फटके मारून त्याच्या जबड्यातून शेळीची सुटका केली. तिटकारे यांना बिबट्याचे दात लागले असून, त्यांच्यावर आणि शेळीवरदेखील उपचार करण्यात आले. दरम्यान, जांभोरी परिसरात आढळणार्‍या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले, दुंदा भोकटे व ग्रामस्थ यांनी केली आहे.

Back to top button